yuva MAharashtra दाव्याविना विविध बँकामध्ये १७६ कोटी पडून

दाव्याविना विविध बँकामध्ये १७६ कोटी पडून

सांगली टाईम्स
By -

 


- सांगली जिल्ह्यातील स्थिती 
- ७ लाख ७५ हजार बँक खातेदारांचा समावेश

सांगली । प्रतिनिधी

जिल्ह्यातील सांगली -मिरज शहरासह ग्रामीण भागातील विविध बँकांमध्ये १७६ कोटी रुपये बचत, चालू व मुदत ठेव स्वरुपात ठेवलेले ८,७५,३१५ इतके खातेदार १० वर्षे पुन्हा बँकेकडे फिरकले नसल्याने ही रक्कम रिझर्व्ह बँकेत जमा करण्यात आली आहे. अशा मयतांचे वारस किंवा जिवंत असलेल्या खातेदारांनी ३१ डिसेंबरपर्यंत संबंधित बँकेशी संपर्क करायचा आहे. ज्या बँकेत आपले खाते आहे तेथे कागदपत्रे सादर करून आपली रक्कम काढून घ्यावी. रिझर्व बँकेने यासाठी दिलेल्या तीन महिन्याच्या मुदतीत बँकेला कागदपत्रे सादर करावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केले आहे.

रिझर्व्ह बँकेच्या नियमाप्रमाणे खातेदाराने बचत, चालू व मुदत ठेव अशा स्वरूपातील १० वर्षांत खात्यावर कुठलाही व्यवहार केला नसेल तर ती रक्कम संबंधित बँकेने रिझर्व्ह बँकेकडे (आरबीआय) जमा करावी लागते, अशी रक्कम मागणी करण्याचा अधिकार खातेदार किंवा मयत खातेदाराच्या वारसाला आहे. त्यासाठी रिझर्व्ह बँकेने खातेदारांना संबंधित बँकेशी संपर्क करून आपली रक्कम मागणी करण्यास तीन महिन्यांचा अवधी दिला आहे. यामध्ये सर्वाधिक रक्कम ही सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ३,७२,८३८ खातेदारांची ७५.७२  कोटी रुपये इतकी रक्कम आहे. त्यानंतर बँक ऑफ इंडियाच्या १,६१,९१८  खातेदारांचे ३३.५४ कोटी, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ४४९३९ खातेदारांचे १६.९९ कोटी, आय सी आय सी आय बँकेच्या ९६९१७  खात्यावर १६.१५ कोटी, बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये १६१६  खात्यावर ८.७७ कोटी, युनियन बैंक ऑफ इंडियाच्या ३००७५  खात्यावर ७.६५ कोटी, रत्नाकर बँकेच्या १४९६८ खात्यावर ५.८० कोटी तसेच इतर बँकांनीही रक्कम रिझर्व्ह बँकेकडे वर्ग केली आहे.

केंद्र सरकारच्या वित्त विभाग व भारतीय रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार १ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत जिल्हा अग्रणी बँक यांच्या पुढाकाराने आणि सर्व सदस्य बँकांच्या सहकार्याने जनजागृती मोहीम  राबविण्यात येत आहे. बँकामध्ये बचत खाते, चालू खाते व ठेव स्वरूपात असलेल्या १० वर्षापेक्षा जास्त काळ दावा न केलेल्या म्हणजेच अनेक खातेदार खात्यावर असलेल्या रकमा काढण्यासाठी ते बँकेकडे फिरकले नाहीत. अशा स्वरूपातील रकमा परत मिळवण्यासाठीची जनजागृती व दावा मोहीम चालू आहे. यासाठीची मार्गदर्शक तत्वे केंद्र सरकारच्या वित्त विभाग व राज्यस्तरीय बँकर्स समितीने बँकांना दिलेले आहेत. त्याच्या अधीन राहून या मोहिमेअंतर्गत खातेदारांना त्यांच्या खात्यावरील रक्कम काढून घेता येईल अथवा पुढे नुतनीकरण करून ठेवताही येतील. ठेवी परत मिळविण्यासाठी संबंधित खातेदारांनी/ वारसांनी आपल्या बँकेच्या शाखेत संपर्क साधून आवश्यक कागदपत्रे व अद्ययावत घधउ सादर करणे आवश्यक आहे. या मोहिमेद्वारे सर्व बँकांकडून जनजागृती शिबिरे व ग्राहक भेटी आयोजित केल्या जाणार असून, खातेदारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केले आहे.
Tags: