yuva MAharashtra सांगलीतून ६ हजार ९०० टन द्राक्षांची निर्यात

सांगलीतून ६ हजार ९०० टन द्राक्षांची निर्यात

सांगली टाईम्स
By -

 


◼️तासगाव, खानापूर मध्ये सर्वाधिक निर्यातक्षम द्राक्षे

◼️ युरोपसह २५ देशांत स्थान

◼️ २२० कोटींची उलाढाल शक्य

◼️ यंदा ११ ते १२ हजार मे. टन निर्यातीची    शक्यता 

सांगली / प्रतिनिधी 

निर्यातक्षम द्राक्षांसाठी जगभरात ओळख असलेल्या सांगली जिल्ह्यातून गोड रसाळ द्राक्षाच्या निर्यातीला सुरुवात झाली आहे. युरोपीयन देशासह युनायटेड अरब, रशिया, सौदी अरेबिया, मलेशिया, सिंगापूर, ओमान या देशामध्ये ४७१ कंटेनरमधून आतापर्यन्त ६९१६ मे. टन द्राक्ष निर्यात झाली आहेत. यामध्ये खानापूर, तासगाव तालुक्यातील निर्यातक्षम द्राक्षांचा मोठ्या प्रमाणात समवेश आहे. हंगाम संपेपर्यंत आणखी ५०० हून अधिक कंटेनर द्राक्षांची निर्यात होईल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. दरवर्षी निर्यातक्षम द्राक्षपोटी २०० कोटींचे परकीय चलन मिळते. यावर्षी यामध्ये २० कोटींची वाढ होण्याची शक्यता आहे.

द्राक्ष हे देशाला मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळवून देणारे फळ आहे.  सततचे प्रतिकूल वातावरण, वाढता उत्पादन खर्च आणि मजूरटंचाई या अडथळ्यांवर मात करीत  दुष्काळी तालुक्यातील जिद्दी द्राक्ष उत्पादकांनी निर्यातीची झेप उंचावतच ठेवली आहे. गोड चवीच्या रसाळ व करकरीत द्राक्षांनी गुणवत्तेच्या जोरावर युरोपसह जागतिक बाजारात स्थान निर्माण केले आहे. जिल्ह्यातील तासगाव, खानापूर तालुक्यामध्ये सर्वाधिक निर्यातक्षम द्राक्षांचे उत्पादन घेतले जाते. जत, मिरज पूर्वसह अन्य भागातही निर्यातक्षम द्राक्ष शेती केली जाते. यंदा जिल्ह्यातील १० हजार १६५ शेतकर्‍यांनी निर्यातक्षम द्राक्ष उत्पादक म्हणून कृषी विभागाकडे नोंदणी केली आहे.

२२० कोटींची उलाढाल शक्य 
दरवर्षी जिल्ह्यातून १८ ते १९ हजार मेट्रिक टन द्राक्षे निर्यात होतात. त्यातून २०० कोटींच्या आसपास उलाढाल होते. यंदा यामध्ये २० कोटींची वाढ होण्याची शक्यता आहे. यंदा उत्पादन कमी आहे, परंतू दर अधिक आहे. थॉमसन द्राक्षांना प्रति किलो ८० ते ८५, सोनाक्का ९० ते १०० तर अल्प प्रमाणात उत्पादन होत असेल्या क्रिमसन द्राक्षांना सरासरी १२० रुपये इतका दर मिळत आहे. अजून ५०० कंटेनर द्राक्ष परदेशात जातील अशी स्थिती आहे.  यंदा पावसामुळे निर्यातक्षम द्राक्षांच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. यंदा ११ ते १२ हजार मे. टन द्राक्षे निर्यात होतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. तरीही दर चांगला मिळत असल्याने शेतकर्‍यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण आहे.
पण प्रत्यक्षात केवळ ५२३ शेतकर्‍यांचीच द्राक्षे परदेशात पोहचली आहेत. लहरी हवामान, पाऊस, काडीची वाढ न झाल्याने निर्यातक्षम द्राक्षांच्या गुणवत्तेवर थोडा परिणाम झाला आहे. तरीही येथील द्राक्षांनी विदेशातील बाजारपेठ काबीज केली आहे. तासगाव तालुक्यातील डोंगरसोनी, सावळज, वायपळे, जरंडी तर खानापूर तालुक्यातील गावांमध्ये मोठ्या प्रमाणात निर्यातक्षम द्राक्षांचे उत्पादन घेण्यात आले आहे. युरोपीयन देशांसह चीन, रशिया, मलेशिया,  हाँगकाँग, इंडोनेशिया, दुबई, सौदी अरेबिया, ओमान, कॅनडासह जवळपास २५ देशांच्या बाजारपेठामध्ये सांगलीच्या द्राक्षांनी गोडी निर्माण केली आहे. आतापर्यन्त जिल्ह्यातून ४७१ कंटेनर द्राक्षांची निर्यात झाली आहे. एकूण ६ हजार ९१६ मेट्रिक टन द्राक्षे परदेशात पोहचली आहेत.


Tags: