◼️२४६ व्या वर्षात पदार्पण
◼️ गणपती पंचायतन कडून भाविकांना निमंत्रण
तासगाव / प्रतिनिधी
येथील सुप्रसिद्ध श्री गणपती पंचायतन देवस्थान ट्रस्ट तासगाव 'श्री' गणेशाचा शनिवार दि १ रोजी २४६ वा वाढदिवस साजरा होत आहे.श्री मंदिराचे संकल्पक आणि संस्थापक श्रीमंत सर सेनापती परशुराम भाऊ पटवर्धन यांनी इसवी सन १७७९ मध्ये फाल्गुन शुक्ल २ शके सतराशे एक या शुभ दिनी 'श्री' गणपतीरायांची प्रतिष्ठापना तासगावात केली. परशुराम भाऊंनी प्राणप्रतिष्ठापना दिन हा श्रींचा वाढदिवस म्हणून साजरा करण्याची २४६ वर्षांपूर्वी परंपरा सुरू असल्याची माहिती मंदिराचे विश्वस्त राजेंद्र पटवर्धन यांनी दिली.
त्यानुसार यंदाचा २४६ वा वाढदिवस शनिवारीं साजरा करण्यात येत आहे. त्या निमित्ताने शनिवारी सकाळी १० वाजता पुण्याहवाचन व संकल्प, त्यानंतर १०८ विविध द्रव्यांनी श्रींचा अभिषेक घालण्यात येणार आहे.त्यानंतर मंत्र पठण होमहवन,दुपारी नारदिय कीर्तन, सायंकाळी गौरी गज लक्ष्मीच्या नेतृत्वात वाजत गाजत छबिना निघणार आहे.
याबाबत बोलताना विश्वस्त राजेंद्र पटवर्धन म्हणाले, गेल्या २४६ वर्षापासून अखंडितपणे श्रींचा वाढदिवस साजरा करण्यात येत असून त्यात आतापर्यंत कुठलाही खंड पडलेला नाही. लोकांच्या भक्तीत वाढ व्हावी, गाव समृद्ध व्हावं, गावाची प्रसिद्धी व्हावी या उद्देशाने श्रीं चा वाढदिवस साजरा केला जातो. श्री गणेश भक्तांनी मंदिरात मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्रीं ना भक्तीपूर्वक शुभेच्छा देऊन त्यांचे आशीर्वाद घ्यावेत असे आवाहन श्री गणपती पंचायतन देवस्थान ट्रस्ट विश्वस्त राजेंद्र परशुराम पटवर्धन, सौ. सितारादेवी राजेंद्र पटवर्धन, राहुल राजेंद्र पटवर्धन, महाव्यवस्थापक पवनसिंह कुडमल, अथर्व जोशी, पंडित अनंतशास्त्री आणि दिपकशास्त्री जोशी यांनी केले आहे.
