माजी मंत्री बाळासाहेब थोरात, प्रा. सदानंद मोरे, डॉ. लताताई देशपांडे, आप्पासाहेब पाटील सत्कारमूर्ती
सांगली / प्रतिनिधी
मिरज येथील स्व. गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टच्या वतीने दिला जाणारा यंदाचा 'स्व. गुलाबराव पाटील जीवन गौरव' पुरस्कार काँग्रेसचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात, श्री संत तुकाराम महाराज यांचे वंशज प्रा. सदानंद मोरे तर ऋणानुबंध पुरस्कार डॉ. लताताई देशपांडे, आप्पासाहेब पाटील यांना जाहीर झाला आहे. रविवार २ मार्च रोजी येथील भावे नाट्य मंदिर येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. ताराबाई भवाळकर यांच्या हस्ते देण्यात येणार आहे. रोख २५ हजार रुपये, शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष गुलाबराव पाटील यांनी दिली.
माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तर माजी राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार सोहळा संपन्न होईल असे सांगत पाटील म्हणाले, ट्रस्टच्या वतीने दरवर्षी सामाजिक, राजकिय, शैक्षणिक, सहकार, कला, साहित्य आदि क्षेत्रात ऊल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना जीवन गौरव व ऋणानुबंध पुरस्कार दिला जातो. या सोहळ्यास समस्त सांगलीकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन पाटील यांनी केले आहे. यावेळी कार्यकारी विश्वस्त प्रमिलादेवी पाटील, विश्वस्त शंकर तावदारे, डॉ. इक्बाल तांबोळी व अॅड. विरेंद्रसिंह पाटील, बिपीन कदम, प्रा. एन. डी. बिरनाळे, सनी धोतरे, रंगराव शिपुगडे, प्रशांत अहिवळे, महावीर पाटील उपस्थित होते.
