![]() |
| पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाच्या बैठकीत बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. बाजूस पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील व अधिकारी. |
◼️ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
◼️ २० घरांना थेट नळाद्वारे पाणीपुरवठा
◼️ नळ जोडणीचे उद्दिष्ठ पूर्ण करा
मुंबई / प्रतिनिधी
पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाची आढावा बैठक आज मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडली. राज्यातील प्रत्येक गावाला स्वच्छ आणि सुरक्षीत पाणी पुरवठा, शाश्वत स्वच्छता यासोबतच ‘हर घर जल’ योजनेद्वारे १०० टक्के घरगुती नळ जोडणीचे उद्दिष्ट पूर्ण करावे. मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प मराठवाड्याचा दुष्काळ संपविण्यासाठी महत्वाकांक्षी प्रकल्प असून त्यासाठी केंद्र शासनाकडून विशेष बाब म्हणून निधी मिळविण्यासाठी प्रयत्न करावा, असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या बैठकीत दिले.
राज्यात जलजीवन मिशन अंतर्गत २० हजार घरांना थेट नळाद्वारे पाणीपुरवठा केला जात असून या माध्यमातून सुमारे ८० लाख कुटुंबांना फायदा होत आहे. उर्वरित घरांना नळाद्वारे पाणी पुरवठ्यासाठी तातडीने कार्यवाही करावी असेही निर्देश त्यांनी याप्रसंगी दिले.
तसेच स्वच्छ भारत मिशन ग्रामीणच्या टप्पा दोन अंतर्गत ग्रामीण भागात वैयक्तीक शौचालयांबरोबरच सार्वजनिक शौचालयांच्या निर्मितीवर भर देण्याचे निर्देश यासमयी दिले. शंभर दिवसांच्या उपक्रमामध्ये 'हर घर जल' अंतर्गत १०० टक्के नळ जोडणीचे उद्दीष्ट्य पूर्ण करावे. शाळा, अंगणवाड्यांमध्ये १०० टक्के पिण्याच्या पाण्यासाठी नळ जोडणी उपलब्ध करून द्यावी, असेही यावेळी नमूद केले.
यावेळी पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव नवीन सोना, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सदस्य सचिव अभिषेक कृष्णा, जल जीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन अभियान संचालक ई.रविंद्रन, भुजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा आयुक्त विजय पाखमोडे आणि संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
