yuva MAharashtra कर्नाटकातील सोनसाखळी चोरटा गजाआड

कर्नाटकातील सोनसाखळी चोरटा गजाआड

सांगली टाईम्स
By -

स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई: चार लाखांचा मुद्देमाल जप्त

सांगली / प्रतिनिधी

सांगली-मिरजेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसडा मारून चोरणाऱ्या कर्नाटकातील सराईत गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अटक केली. मेहंदी हसन अक्रमअली सय्यद (वय ३८, रा. चिद्री रोड, हुसेनी कॉलनी, चिद्री, बिदर, कर्नाटक) असे संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून दुचाकी, सोन्याचे दागिने असा चार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 

याबाबत माहिती अशी की, पोलिस अधीक्षक संदीप घुगे, यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला चेन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे यांनी सहायक निरीक्षक पंकज पवार व कर्मचाऱ्यांचे पथक नियुक्त केले. सांगली विभागात गस्तीवर असताना पथकातील कर्मचारी सागर लवटे, अनिल कोळेकर व विक्रम खोत यांना मेहंदी हसन अक्रमअली सय्यद हा चोरी केलेले दागिने विक्रीसाठी दुचाकीवरून सूतगिरणी चौक ते कुपवाड रोड परिसरामध्ये येणार असल्याची माहिती मिळाली. पथकाने कुपवाड रोड परिसरात सापळा रचला. यावेळी संशयित सय्यद हा रस्त्याकडेला दुचाकीवर बसलेला दिसला. पथकाने शिताफीने त्याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता, त्याच्या पॅन्टच्या खिशामध्ये सोन्याचे दागिने मिळून आले. 

दागिन्यांबाबत विचारणा केली असता त्याने सांगली येथील त्रिकोणी बागेजवळ, नागराज कॉलनी, मिरज येथील अंबाबाई रेसिडेन्सीसमोरून व ब्राह्मणपुरी पोस्ट ऑफिस येथून महिलांच्या दागिन्यांची चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून तीन लाख ४१ हजार रुपयांचे दागिने व ६५ हजारांची दुचाकी, असा चार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सय्यद हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी मुंबई व कर्नाटक राज्यात चेन स्नॅचिंग व मोबाईल चोरीचे गुन्हे दाखल आहेत. पुढील तपास विश्रामबाग पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे.

Tags: