![]() |
- आयुक्त सत्यम गांधी यांचे हस्ते मंजुरी पत्रांचे वाटप
- केंद्र शासनाच्या अंगीकार उपक्रमांतर्गत
- विशेष कार्यक्रमाचे आयोजन
सांगली / प्रतिनिधी
सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रामधील प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २.० अंतर्गत नव्याने मंजुर झालेल्या डिपीआर क्रमांक ११६ मधील लाभार्थ्यांना घरकुल मंजुरीचे पत्र आयुक्त सत्यम गांधी यांचे हस्ते वितरीत करण्यात आले.
केंद्र शासनाच्या “अंगीकार उपक्रमांतर्गत” अधिकाधिक नागरीकांना योजनेचा लाभ देणे, लोकांना योजनांची माहिती देणे, शासकीय योजनांचा प्रचार आणि प्रसार करणे या करीता “अंगीकार उपक्रम” राबविण्यात येत आहे. या अंगीकार उपक्रमांतर्गत महानगरपालिका क्षेत्रातील नागरीकांना प्रधानमंत्री आवास योजनेतुन लाभ घेता यावा यासाठी योजनेची माहिती देणे आणि यापुर्वी ज्या लाभार्थींनी ऑनलाईन अर्ज केले आहेत. अशा ११६ लाभार्थींचा डिपीआर तयार करुन शासनाकडे मान्यतेसाठी सादर करण्यात आला होता. या ११६ लाभार्थ्यांच्या डिपीआरला नुकतीच मान्यता मिळालेली आहे. त्यानुसार या ११६ लाभार्थ्यांना घरकुल मंजुरीचे पत्र महानगरपालिका आयुक्त् सत्यम गांधी यांचे हस्ते वितरीत करण्यात आले. प्रधानमंत्री आवास योजनेच्या मार्गदर्शक सुचनानुसार प्राधान्यक्रमाने दिव्यांग नागरीक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांना लाभ देण्यासाठी प्रयत्न करण्याबाबत सुचना आहेत. त्यानुसार आज या ११६ लाभार्थ्यांपैकी दिव्यांग लाभार्थी, आशा सेविका यांचे घरकुल मंजुर करण्यात आले आहे. या दिव्यांग लाभार्थींना आयुक्त सत्यम गांधी यांनी जागेवर जाऊन मंजुरीचे पत्र दिले.
यावेळी प्रधानमंत्री आवास योजना कक्ष प्रमुख व समाज विकास तज्ञ सागर शिंदे यांनी प्रास्ताविक केले व योजनेची माहिती देतेवेळी सांगितले की, आवास योजनेतील मंजुर लाभार्थ्यांनी एक महिन्यापर्यंत बांधकाम परवाना काढावा त्यासाठी आवश्यक ते पुर्ण सहकार्य करण्यात येईल असे सांगितले. तसेच योजनेचे अनुदान मिळण्यासाठीचे जिओ टॅगिंगचे टप्पे कसे आहेत त्यासाठी आवश्यक पुर्तता कोणत्या आहेत याची माहीती दिली. यावेळी आयुक्त् सत्यंम गांधी यांनी लाभार्थ्याना मार्गदर्शन करतेवेळी सांगितले की, प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांना बांधकाम परवाना काढणेकरीता विकास शुल्क माफ करण्याचा निर्णय शासनाकडुन घेण्यात आलेला आहे. त्यामुळे याचा फायदा या सर्व लाभार्थ्यांना होणार आहे. सर्वानी लवकरात लवकर बांधकाम परवाने काढुन बांधकाम सुरु करावे.
तसेच यापुर्वी ज्या लाभार्थ्यांनी घरकुलाचे अनुदान घेतले आहे परंतु घरकुल बांधकाम वेळेत पुर्ण केले नाही अशा लाभार्थ्यांवर अनुदान वसुलीची व बँक खाती गोठवण्याची कारवाई महानगरपालिकेकडुन करण्यात आलेली आहे. त्यामुळे शासनाकडुन मिळालेल्या अनुदानाचा घरकुल बांधकाम साठी वापर करुन लवकरात लवकर घरकुल पुर्ण करावे. अशा कारवाईला सामोरे जावे लागणार नाही याची सर्वानी दक्षता घ्यावी. तसेच आवास योजनेचा लाभ सर्वाना घेता यावा यासाठी महानगरपालिकेमधील प्रधानमंत्री आवास योजना कक्ष नेहमीच सहकार्य करेल. त्यामुळे पात्र व गरजु नागरीकांनी या कक्षाशी संपर्क साधुन योजना सर्वापर्यंत पोहचवण्यासाठी सहकार्य करावे. यावेळी सहाय्यक आयुक्त गिरीष पाठक, अभियंता महेश मदने आणि इतर कर्मचारी व मोठया संख्येने लाभार्थी व नागरीक उपस्थित होते.
