yuva MAharashtra सन्मानजनक जागा न मिळाल्यास स्वबळावर लढणार

सन्मानजनक जागा न मिळाल्यास स्वबळावर लढणार

सांगली टाईम्स
By -

 


- विशालसिंग राजपूत
-जिल्हापरिषद, महापालिकेत ताकदीचे उमेदवार देणार

 सांगली। प्रतिनिधी

शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) हा महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष आहे. आगामी जिल्हापरिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायत, महापालिका निवडणूकींमध्ये आघाडीच्या नेत्यांनी शिवसेनेला विश्वासात घ्यावे. सन्मानजनक जागा द्याव्यात अन्यथा स्वबळावर लढू. प्रत्येक ठिकाणी ताकदीने उमेदवार उभे करु असा इशारा ठाकरे गटाचे सांगली जिल्हाप्रमुख विशालसिंग राजपूत यांनी दिला आहे. दरम्यान लवकरच सांगली ठाकरे गटाच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत मेळावा घेणार असल्याचेही राजपूत यांनी यावेळी बोलताना सांगितले.

राजपूत म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांचे पडधम वाजू लागले आहेत. शिवसेनेचीही निवडणूक लढण्याची तयारी पूर्ण झाली आहे. तुल्यबळ उमेदवारांची चाचपणी सुरु आहे. गटप्रमुख, बुथप्रमुख, शाखा प्रमुखांसह सर्व पदाधिकार्‍यांची संघटनात्मक बांधणी भक्कम आहे. महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असल्याने आघाडीतील नेत्यांशी चर्चा केली जाईलच. पण शिवसेनेला सन्मानजनक जागा मिळाव्यात. अन्यथा सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका शिवसेना स्वबळावर लढेल. गत वेळी सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेची निवडणूक शिवसेनेने ताकदीने लढवली होती. महापालिका क्षेत्रात 57 जागांवर उमेदवार उभे केले होते. जनतेेने शिवेसेनेच्या पारड्यामध्ये 50 हजारांहून अधिक मतदान टाकले होतेे.
भाजपा जातीयवादी पक्ष
भारतीय जनता पार्टी हा पक्ष जातीयवादी आहे. जाती-जाती, धर्मा-धर्मामध्ये वाद पेटवून राजकारण केले जात आहे. अनेक अनेक अल्पसंख्याक समाजांना टार्गेट केले जात आहे. शेतकरी, कष्टकर्‍यांच्या प्रश्नांची या पक्षातील नेत्यांना जाण नाही. सर्वसामान्यांचे प्रश्न जैसे थे आहेत. याऊलट शिवसेनेने नेहमीच 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण केले आहे. सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना शेतकर्‍यांना कर्जमाफी केली. शिवभोजन सारखी योजना सुरु केली. कोरोना काळात दर्जेदार सुविधा दिल्या. याच जोरावर शिवसेना निवडणूकीला सामोरी जाईल असे विशालसिंग राजपूत यांनी सांगितले
जनतेमध्ये शिवसेनेप्रती जिव्हाळा आहे. याच जोरावर शिवसेना निवडणूकीला सामोरी जाईल असे सांगत राजपूत म्हणाले, सर्वसामान्य जनता, शेतकरी, कष्टकर्‍यांच्या प्रश्नांवर शिवेसेनने नेहमीच आक्रमक भूमिका घेतली आहे. यापुढच्या काळातही शिवसेना सर्वसामान्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील. आक्रमकपणे रस्त्यांवर उतरुन न्याय देण्यासाठी प्रयत्नशील आहे. सांगली शहरप्रमुख मयूर घोडके म्हणाले, सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिका क्षेत्रात अत्यंत वाईट अवस्था आहे. कोट्यवधी रुपयांचा निधी खर्चूनही रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. नाल्यांची स्वच्छता व्यवस्थित होत नाही. त्यामुळे नागरिकांच्या घरांमध्ये पाणी घुसते. या विरोधात यापुढच्या काळात आकमक आंदोलने केली जातील. यावेळी महादेव मगदूम, प्रताप विचारे, रुपेश मोकाशी, विराज बुटाले, ओकांर देशपांडे आदी उपस्थित होते.  



Tags: