- आमदार जयंत पाटील
- भाजपची हळूहळू काँग्रेस होतेय
सांगली / प्रतिनिधी
आता सगळे मिळून, सगळ्यांनी बऱ्याच गोष्टी केल्या. काही जण याची चौकशी करू, त्याची चौकशी करू, काय करा ना प्रॉब्लेम नाही आपल्याला. नुसते बोलू नका, असे जब्बरदस्त प्रत्युत्तर राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी भाजप नेत्यांचे नाव न घेता दिले आहे. तुम्ही सगळे एका जयंत पाटलांसाठी एकत्र येता. प्रश्न काय आहे? जयंत पाटलांच्या आई - वडिलांबद्दल कोणीतरी चुकीची भाषा वापरली. हे जाणूनबुजून केलं जातं ही लोकांची खात्री झाली आहे. याचे उत्तर येणाऱ्या निवडणुकीत लोक याचे उत्तर देतील असेही आमदार पाटील म्हणाले.
आपल्याला काही झालं तरी सत्तेतच जायचे आहे, असे काही लोकांचं म्हणणं असतं. अलीकडेच एक तरुण आमचे भारतीय जनता पक्षामध्ये गेले. त्यांच्या आजोबांचा इतिहास काय आहे? कम्युनिस्ट चळवळ, स्वातंत्र्यसंग्राम सेनानी, बहुजन पुरस्कर्ते, कायम आयुष्यभर त्यांनी जातीयवाद्यांची अंगावर सावली पडून दिली नाही. पण एक आमदारकी मिळते म्हटल्यावर आमची बाजू सोडून तिकडे गेले. मला आश्चर्य वाटतं. भारतीय जनता पार्टी प्रवेश घेताना पार्श्वभूमी, विचार काय आहेत हे पाहत नाही. भारतीय जनता पक्षाची आता हळूहळू काँग्रेस व्हायला लागली आहे,असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. पण हे लोकांना पटत नाही.
जिल्ह्यातील महाविकासआघाडीतील नेत्यांमध्ये कोणतेही वाद नाहीत. वेगवेगळ्या चर्चा होत असतात. त्यावर प्रत्येकवेळी प्रतिक्रिया देणे कठीण असल्याचे सांगत आमदार पाटील म्हणाले, इस्लामपूरचे नाव बदलत असताना स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून मला विचारले असते तर उरण - ईश्वरपूर करा असे सांगितले असते. ईश्वरपूर नावाला कोणाचाच विरोध नाही, असेही आमदार पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.
