- मंगळवारी अधिकृत पक्ष प्रवेश
- शरद लाड यांच्यामुळे पलूस, कडेगावचे राजकिय समीकरण बदलणार
सांगली । प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला सांगलीत मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे पुणे पदवीधर मतदार संघाचे आमदार अरुण लाड यांचे सुपूत्र शरद लाड यांनी भाजपाचे कमळ हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवार ७ ऑक्टोंबर रोजी ते मुंबई येथे भाजप पक्ष कार्यालयामध्ये अधिकृत प्रवेश करणार आहेत. लाड यांच्या भाजप प्रवेशाचा निर्णय राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांना मोठा धक्का मानला जातो. तर पलूस-कडेगाव मतदार संघातील राजकिय समीकरणे बिघडवणारा ठरु शकतो. काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम यांच्या समोरील अडचणीही यामुळे वाढणार आहेत.
पलूस-कडेगाव मतदार संघात लाड कुटूंबाचा मोठा जनसंपर्क आहे. क्रांतीवीर जी. डी. बापू लाड यांचे वारसदार म्हणून आमदार अरुण लाड व युवा नेते शरद लाड यांची ओळख आहे. क्रांती सहकारी साखर कारखान्यासह अन्य सहकारी संस्थांचे जाळे लाड कुटूंबाने पलूस-कडेगाव मतदार संघामध्ये विणले आहे. विशेषतः पूलस तालुक्यांमध्ये मोठा गट आहे. राष्ट्रवादी शरदचंद्रपवार पक्षाचे निष्ठावंत आमदार म्हणून अरुण लाड यांची ओळख आहे. दरम्यान आमदार लाड यांचे सुपूत्र क्रांती कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड हे आता भाजपच्या गळाला लागले आहेत. त्यांचा भाजप प्रवेश निश्चित झाला आहे. येत्या मंगळवार ७ ऑक्टोंबर रोजी ते मुंबई येथे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
शरद लाड यांचा भाजप प्रवेश पलूस-कडेगाव मधील राजकिय समीकरणे बदलणारा आहे. काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम यांच्या समोरील अडचणी यामुळे वाढणार आहेत. तर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्यासाठी हे धक्कादायक आहे. एकीकडे भाजपकडून आमदामर जयंत पाटील यांना डॅमेज करण्याचे प्रयत्न सातत्याने सुरु असताना. दुसरीकडे त्यांच्याच पक्षाच्या आमदाराचा मुलाचा भाजपमध्ये प्रवेश होत असल्याने सांगली जिल्ह्यात भाजपाची ताकद वाढणार आहे. पुणे पदवीधर निवडणूकीसाठी शरद लाड यांच्या नावाचा भाजपकडून विचार होऊ शकतो. त्या अनुशंगानेच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा सुरु आहे.
