- भाजप, राष्ट्रवादीकडून श्रेयवाद
- महापालिका निवडणुकीची पार्श्वभूमी
सांगली / प्रतिनिधी
संजयनगर (सांगली) येथील मुख्य चौकामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा अश्वारुढ पुतळा बसविण्यास जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी नुकतीच मंजूरी दिली. महापालिकेत महाविकास आघाडीची सत्ता असताना अहिल्यादेवींचा पुतळा आणि स्मारकाच्या कामास गती लागली. राष्टवादीचे स्थानिक नगरसेवक मनगूआबा सरगर यांनी यासाठी सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्या पाठपुराव्यामुळेच संजयनगर चौकात अहिल्यादेवींचा अश्वारुढ पुतळा उभा राहण्याचा मार्ग खुला झाला आहे. पण महापालिकेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर याचे राजकिय भांडवल केले जात आहे. अहिल्यादेवींच्या स्मारकासाठी आपण किती खस्ता खाल्ल्या याचा उदोउदो काही भाजपवाशी माजी नगरसेवकांकडून सुरु आहे. यामुळे समस्त धनगर समाजांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
सांगलीचे संजयनगर हे महत्वाचे उपनगर. गुन्हेगारी कारवायांमुळे बदनाम असलेले हे उपनगर आता कात टाकू लागले आहे. या उपनगराचा चांगला कायापालट झाला आहे. गुन्हेगारी नव्हे तर धार्मिकतेचे संजयनगर अशी नवी ओळख या परिसराला निर्माण झाली आहे. या भागातील अनेक मंदीरांचा आता कायापालट झाला आहे. स्वामी समर्थांपासून मारुतीराया पर्यंतची मंदीरे दिमाखात उभी राहिली आहे. गुन्हेगारी कमी झाली आहे. याच भागात टॉपचे वाचनालय होत आहे. सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ, प्रभागातील स्थानिक नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते, सुजाण नागरिक यामुळेच हे शक्य झाले आहे. दरम्यान याच उपनगराच्या मुख्य चौकामध्ये (जो चौक लव्हली सर्कल असा ओळखला जायचा) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे भव्य स्मारक उभे राहत आहे. स्मारकाचे बहुतांशी काम पूर्ण झाले आहे. केवळ पुतळा बसविण्यास मंजूरी मिळण्याची प्रतिक्षा होती. तीही आता संपली आहे. जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी या ठिकाणी अहिल्यादेवींचा पुतळा बसविण्यास परवानगी दिली आहे.
दरम्यान यावरुन आता श्रेयवादाचे राजकारण सुरु झाले आहे. पुतळा समितीचे सदस्य असलेले माजी नगरसेवक मनगूआबा सरगर यांचे अहिल्यादेवींच्या स्मारक, पुतळयासाठीचे प्रयत्न जगजाहीर आहेत. महापालिकेत महाविकास आघाडीची सत्ता असताना सरगर यांच्या माध्यमातून या कामास गती मिळाली हे वास्तव आहे. दरम्यान काही महिन्यापूर्वी काँग्रेसचे माजी नगरसेवक मनोज सरगर यानी भाजपामध्ये प्रवेश केला. त्यावेळी त्यांनी या स्मारकाचा उल्लेख केला होता. आता पुतळा उभा करण्यास मंजूरी मिळाल्यानंतर हे भाजपामुळेच झाले, असे बोलले जात आहे. या निर्णयाचे स्वागत करत असताना भाजपाला याचा राजकिय पॐायदा कसा होईल याकडे पाहिले जात आहे. या भागात प्रभाग 11 आणि 9 मध्ये धनगर समाजाची मोठी ताकद आहे. हा समाज ज्याच्यासोबत त्याचा विजय निश्चित मानला जातो. याच अनुशंगाने अहिल्यादेवींच्या पुतळ्याकडे आता पाहिले जात आहे. त्यावरुनच आता श्रेयवादाची लढाई सुरु झाली आहे. पण परिसरातील जनता सूज्ञ आहे. महापालिका निवडणूकीत ती कोणाच्या पारड्यात आशिर्वाद टाकते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
