- अध्यक्षा रुपाली चाकणकर
- जनसुनावणीत ५५ तक्रारींचा निपटारा
सांगली / प्रतिनिधी
'महिला आयोग आपल्या दारी' या उपक्रमाच्या माध्यमातून महिलांच्या प्रत्येक तक्रारीचे निवारण करण्याचा प्रयत्न असून, सर्व यंत्रणांतून तक्रारदाराला मदत करण्यात येत आहे. यातून तक्रारदाराला न्याय देऊन महिलांची सुरक्षितता व संरक्षणासाठी राज्य महिला आयोग कटिबद्ध असल्याची ग्वाही आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी आज येथे दिली.
'महिला आयोग आपल्या दारी' या उपक्रमांतर्गत आयोजित जनसुनावणीचच्या अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या. जिल्हा नियोजन समिती सभागृहात झालेल्या या जनसुनावणीस आमदार इद्रिस नायकवडी, जिल्हाधिकारी अशोक काकडे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, महानगरपालिका आयुक्त सत्यम गांधी, आयोगाच्या सदस्य सचिव नंदिनी आवडे, महिला व बालविकास अधिकारी वर्षा पाटील आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. या जनसुनावणीत 55 तक्रारींचा निपटारा करण्यात आला.
जनसुनावणीत ५५ तक्रारींचा निपटारा
या जनसुनावणीत सांगली जिल्ह्यातील महिलांकडून ५५ तक्रारी दाखल झाल्या. यामध्ये वैवाहिक/कौटुंबिक २९ प्रकरणे, सामाजिक ९ प्रकरणे, मालमत्तासंदर्भात ७ प्रकरणे, कामाच्या ठिकाणी छळ ४ प्रकरणे व इतर ६ अशा एकूण ५५ तक्रारींचा समावेश आहे. तीन पॅनलच्या माध्यमातून या तक्रारींवर सुनावणी घेण्यात आली. या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात आली.
शासनाने महिलांच्या सुरक्षिततेसाठी कडक तरतुदी केल्या आहेत. त्यांची माहिती घेऊन महिलांनी त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात तक्रार दाखल करावी, असे आवाहन करून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यावेळी म्हणाल्या, महिलांना त्यांच्या जिल्ह्याच्या ठिकाणी न्याय मिळावा, यासाठी आयोगाकडून 'महिला आयोग आपल्या दारी' हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत जनसुनावणीलापोलिस, प्रशासन, विधीसल्लागार, समुपदेशक, जिल्हा समन्वयक आदि उपस्थित असल्याने तक्रारीवर त्याच ठिकाणी कार्यवाही करण्यात येते. या माध्यमातून आपली कैफियत मांडणाऱ्या महिलांना त्वरित दिलासा देण्याचा प्रयत्न आयोग करत आहे, असे सांगून त्यांनी आयोगाच्या कार्यपद्धतीची माहिती व महिला सबलीकरणाच्या अनुषंगाने सविस्तर मार्गदर्शन केले. हुंडा, बालविवाह, विधवा आदि प्रथा व प्रकार बंद करून स्रीला सन्मानाची वागणूक मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त करून अध्यक्ष रूपाली चाकणकर म्हणाल्या, महिलांनीही आत्मविश्वासाने आयुष्य जगावे. सुपरवुमन होण्याला प्राधान्य देण्याऐवजी महिला म्हणून स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे. महिलाविषयक कायदे, नियम, शासकीय योजनांची माहिती घ्यावी. अडचणीत असलेल्या महिलांनी १५५२०९ किंवा ११२ या हेल्पलाईनवर संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

