- पुष्पराज चौक ते राजारामबापू पाटील पुतळा पद यात्रा
- भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांना उत्तर देणार
- प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्यासह बडे नेते उपस्थित राहणार
सांगली / प्रतिनिधी
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) माजी प्रदेशाध्यक्ष तथा आमदार जयंत पाटील यांच्या संदर्भात आक्षेपार्ह विधानाचे संपूर्ण राज्यात तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. पवारांची राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे. सोमवार २२ सप्टेंबर रोजी सांगलीत पुष्पराज चौक ते स्टेशन चौक येथील राजारामबापू पाटील यांचा पुतळा अशी पदयात्रा काढण्यात येणार आहे. हा इशारा मोर्चा असेल. आता फक्त प्रतिक्रिया देण्याची वेळ नाही, तर सुसंस्कृत महाराष्ट्राच्या मनगटांतील ताकद एकत्रित दाखविण्याची वेळ आहे. वाचाळवीरांना जशास तसे उत्तर देऊ असा इशारा प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी दिला आहे.
याबाबत शिंदे यांनी समाजमाध्यमावर आवाहनात्मक पत्र पोस्ट केले आहे. यामध्ये, आपल्या महाराष्ट्राला एक उदात्त राजकीय संस्कृती आहे. महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांपासून ते आदरणीय शरद पवार साहेबांपर्यंत आणि स्व. आचार्य अत्रे, एस. एम. जोशींपासून ते स्व. बाळासाहेब ठाकरेंपर्यंत आपल्या सर्व टोलेजंग नेत्यांनी एक अशी राजकीय संस्कृती जोपासली आहे जिथे विरोध होतो, अगदी टोकाचा संघर्षही होतो. पण ज्यात अभिनिवेश, द्वेषभावनेला काहीही स्थान नाही आणि राजकीय-सामाजिक जीवनात कार्यरत व्यक्तींबद्दल, त्यांच्या कुटुंबीयांबद्दल अर्वाच्च भाषेला तर अजिबातच स्थान नाही.
परंतु, गेली काही वर्षे ज्यांच्या हाती सत्तेची सूत्र आहेत तिथूनच अर्वाच्च भाषेत बेताल वक्तव्य वारंवार केली जात आहेत किंबहुना मुद्दामहून वाचाळवीर निर्माण केले जात आहेत. जिथे महाराष्ट्राच्या जनतेचे प्रश्न मांडले जातात त्या पवित्र विधानभवनात गुंडांना आणून हाणामारी केली जात आहे. ह्या सर्व पराक्रमांकडे मुख्यमंत्री महोदय जाणते-अजाणतेपणाने दुर्लक्ष करत आहेत जणू काही सत्ताधाऱ्यांकडूनच अशा महाभागांना पोसलं जात आहे.
आता कळस म्हणजे महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते, सहकारमहर्षी दिवंगत राजारामबापू पाटील, ज्यांनी महाराष्ट्राचं अर्थखातं, गृहखातं, जलसंपदा खातं सांभाळून राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी भरीव योगदान दिलं ते सन्मा. जयंतराव पाटील व त्यांच्या कुटुंबियांबद्दल अतिशय अर्वाच्च भाषेत अकलेचे तारे तोडले गेले आहेत. हा महाराष्ट्र मातृसत्ताक संस्कारातून मोठा झालेला आहे. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आईबद्दल बोललं गेलं म्हणून जोरदार टीका झाली पण आज मातृसत्ताक महाराष्ट्राच्या भूमीत एका मातेबद्दल अपशब्द वापरले गेले तरीही सत्ताधारी गप्प का?
स्व. राजारामबापूंचा आणि आमचे नेते, मातृभक्त जयंतरावांचा केला गेलेला अपमान आम्ही कदापिही सहन करू शकत नाही. आम्ही संयम राखतो, मर्यादा पाळतो म्हणून षंड समजत असाल तर तुम्ही मुर्खाच्या नंदनवनात वावरत आहात. आम्ही निश्चित ह्या विकृतीचा प्रतिकार करणार, आणि सर्व शक्तिनिशी महाभागांचे सर्व मनसुबे हाणून पाडणार. माझी 'राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या सर्व नेते, पदाधिकारी व सहकारी कार्यकर्त्यांना विनंती आहे कि, येत्या सोमवारी २२ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी १ वाजता, पुष्पराज चौक, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेजवळ जमू या आणि स्व. राजारामबापूंच्या विचारांसमोर नतमस्तक होऊन... वाचाळवीरांना जशास तसे उत्तर देऊ आणि त्यांना पोसणाऱ्या महायुती सरकारला इशारा देऊ कि, सुसंस्कृत महाराष्ट्राच्या मातीत आणि सह्याद्रीच्या कुशीत हे द्वेषाचं निवडुंग रुजू देणार नाही, असे म्हटले आहे.
