- जिल्हाशल्यचिकीत्सक डॉ. विक्रमसिंह कदम
- ७२५ रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया होणार
सांगली / प्रतिनिधी
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत सांगली जिल्ह्यात ‘नमो नेत्र संजीवनी आरोग्य अभियान’ राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील भटक्या जमातींच्या वस्त्या, दलित वस्त्या, तसेच दुर्बल घटकांच्या वस्त्यांमध्ये हे अभियान राबविण्यात येत असून यामध्ये नागरिकांची नेत्ररोगसंदर्भात मोफत तपासणी, शस्त्रक्रिया व चष्म्यांचे वाटप करण्यात येत आहे. या उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी शिबीरात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम यांनी केले आहे.
नमो नेत्र संजीवनी आरोग्य अभियान अंतर्गत जिल्ह्यातील नागरिकांची नेत्र तपासणी, उपचार व मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. नागरिकांमध्ये नेत्र आरोग्यविषयक जागरुकता वाढवून त्यांना मोफत नेत्र सेवा उपलब्ध करून देण्यासाठी हे अभियात जिल्ह्यात सगळीकडे राबविण्यात येत आहे. या अभियानात दिनांक 17 ते 20 सप्टेंबर अखेर ३ हजार १४८ रूग्ण सहभागी झाले आहेत. ७५२ रूग्णांची मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी नोंदणी झाली आहे. ८१२ रूग्णांची मोफत चष्म्यासाठी नोंदणी झाली आहे. मोतीबिंदू वगळून इतर नेत्ररोगविषयक रूग्णांची संख्या २१४ आहे.
यासाठी अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. गायत्री वडगावे व त्यांची टीम, नेत्र विभाग प्रमुख डॉ. शरद शेगावकर व त्यांची टीम हे अभियान राबविण्याकरिता सक्रिय सहभाग देत आहेत. हे अभियान मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रूग्णालय मदत कक्ष पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय जिल्हा सामान्य रुग्णालय सांगली, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यामार्फत आयोजित करण्यात आले असून जिल्हा सामान्य रूग्णालय, वैद्यकीय महाविद्यालय, ग्रामीण रूग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच विविध सेवाभावी संस्था, धर्मादाय रूग्णालय आणि महात्मा ज्योतीराव फुले जनआरोग्य योजनेच्या अंतर्गत राबविण्यात येणारी रूग्णालये यांच्या सहयोगाने आयोजित केले आहे.
