- माजी आमदार विलासराव जगताप, तम्मनगौडा रवी पाटील
- पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांना निवेदन
सांगली / प्रतिनिधी
जत पंचायत समितीचे कनिष्ठ अभियंता स्व. अवधूत वडार यांच्या संशयास्पद मृत्यूची सखोल चौकशी करावी. संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी जतचे माजी आमदार विलासराव जगताप यांच्यासह जिल्हा परिषदेचे माजी सभापती तम्मनगौडा रवी पाटील यांनी पोलिस अधिक्षक संदीप घुगे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. याशिवाय जिल्हापरिषदेचे सीईओ विशाल नरवाडे यांनी यासंदर्भात निवेदन दिल्याचे जगताप, रवीपाटील यांनी सांगितले.
अवधूत वडार यांच्या कुटुंबीयांच्या सांगण्यावरून त्यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच आहे. त्याच्या नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार हा घातपाताचा प्रकार असून त्याची अद्यापही दखल पोलिसांकडून घेतली जात नाही. गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली जात आहे. घटनेला ५-६ दिवस होऊन गेले पण गुन्हा दाखल होत नाही हे दुर्दैव आहे, अशा भावना यावेळी जगताप, रवीपाटील यांनी अधिकाऱ्यांसमोर मांडल्या.
या संदर्भामध्ये अनेक पक्षांनी आंदोलने केली. नातेवाईकांनी सांगली शहर पोलिस ठाण्यामध्ये तक्रार केली. तरी सुद्धा पोलिसांकडून दखल घेतली आत नाही है दुर्दैव आहे, असे सांगितले. याची दखल घेऊन या घटनेवर आधारित गुन्हा दाखल करून निपक्ष अधिकाऱ्यामार्फत तपास करावा. अवधूत वडर यांच्या मृत्युच्या आदल्या दिवसाचे पंचायत समिती, जत कार्यालयातील अवधुत यांच्या सी.सी.टी.व्ही. फुटेज जप्त करून तपासावेत.
अभियंता अवधूत वडार यांनी दबावापोटी काढलेल्या बीलाच्या एम.बी. व संबंधित कागदपत्रे जप्त करावीत व जप्त केलेल्या कागदपत्राची समिती मार्फत तपासणी करावी. अवधूत वडार यांच्या मृत्यू प्रकरणी नातेवाईकांनी आरोप केलेल्यांचे गेल्या चार महिन्याचे सी.डी. आर. तपासावेत. मेटकरी हे कोण आहेत, ते काय काम करतात हेही तपासणे गरजेचे आहे. या व इतर गोष्टीचा तपास करून संबंधितांवर त्वरित गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी जगताप, रवीपाटील यांनी केली आहे.

