yuva MAharashtra पूरबाधितांशी एकनाथ शिंदे यांचा संवाद

पूरबाधितांशी एकनाथ शिंदे यांचा संवाद

सांगली टाईम्स
By -


- पुरबाधित करंजा गावाच्या शिंदे व करळे वस्तीची पाहणी

परांडा / प्रतिनिधी

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परांडा तालुक्यातील पुरबाधित करंजा गावाच्या शिंदेवस्ती आणि करळेवस्तीला भेट देऊन अतिवृष्टीमुळे पूर येऊन नुकसान झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी वस्तीतील नागरिकांशी संवाद साधून झालेल्या शेतीच्या नुकसानीची व मालमत्तेच्या नुकसानीची माहिती घेतली. यावेळी पालकमंत्री प्रताप सरनाईक, आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, आमदार प्रा.डॉ. तानाजी सावंत यांच्यासह जिल्हाधिकारी व इतर अधिकारी उपस्थित होते.

करंजा गावाजवळील शिंदे वस्तीतील चांगदेव शिंदे यांच्या पुरबाधित घराची पाहणी केली. या वस्तीतील गावकऱ्यांनी पुनर्वसन करण्याची मागणी केली. नक्कीच आपले पुनर्वसन करण्यात येईल अशी ग्वाही शिंदे साहेबांनी त्यांना दिली. बाधित ग्रामस्थ व शेतकऱ्यांना  लवकरच तात्पुरती मदत करण्यात येईल. तसेच पंचनामे करून मदत देण्यात येईल. अटी व निकष यामध्ये शिथिलता आणण्यात येईल. यामध्ये कुठल्याही प्रकारचे राजकारण करू नये.

मदतीपासून कोणीही वंचीत राहणार नाही. सरकार म्हणून आम्ही आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहोत. केंद्र आणि राज्य सरकारची मदत देऊन जनतेला आधार देण्यात येईल. पंचनाम्यानंतर नुकसानीची तीव्रता समोर आल्यावर धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल, असे शिंदे यांनी सांगितले. तसेच यावेळी बाधितांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून त्यांना धीर दिला. 

Tags: