- एक महिन्याचे मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देणार
सांगली / प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व मंत्री, आमदार, खासदार यांनी मोठा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे राज्यातील पूरग्रस्तांना मोठा दिलासा मिळणार आहे. आपले एक महिन्याचे मानधन या सर्व नेत्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये देण्याचा निर्णय घेतला आहे. तसे पत्र प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी काढले आहे.
राज्यात पावसाने हाहाकार माजवला आहे. विशेषतः मराठवाड्यातील बीड, धाराशिवसह अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेकांचे संसार पाण्यात वाहून गेले आहेत. शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. उभी पिके पाण्याखाली गेली आहेत. दरम्यान शासनाने राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी होत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार संपूर्ण मंत्रिमंडळासह पूरस्थितीची पाहणी करत आहेत. दरम्यान उपमुख्यमंत्री अजितदादा पवार अध्यक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्री, आमदार आणि खासदार यांनी मोठा निर्णय घेतला आहे. हे सर्व लोकप्रतिनिधी त्यांचे एक महिन्याचे मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देणार आहेत.
