- चंद्रकांतदादा पाटील
- सांगलीत जयंत पाटलांना इशारा
- भाजप ग्रामीण संपर्क कार्यालयाचे उद्घाटन
सांगली / प्रतिनिधी
गोपीचंद पडळकर काय बोलले त्यांच्यात सुधारणा करु, मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय घोडा मारला. तुम्ही घाबरता म्हणून सगळे एकत्र येवून अटॅक करताय. पण जयंतराव अर्थमंत्री असताना झालेला लॉटरी घोटाळा, जिल्हा बँकेच्या माजी चेअरमननी केलेली नोकरभरती आणि बेकायदेशीर कर्जवाटप करुन मोठा घोटाळा केला आहे. याची चौकशी लावू, असा इशारा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे बोलताना दिला.
दरम्यान येत्या १ ऑक्टोबरला सांगलीत इशारा सभा घेऊ. तत्पूर्वी जातीयता, विकृत मनस्थितीचा रावण जाळू असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. विश्रामबाग येथे भाजप जिल्हा ग्रामीण कार्यालयाचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याहस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आ. डॉ. सुरेश खाडे, आ. गोपीचंद पडळकर, आ. सत्यजित देशमुख, राज्य उपाध्यक्ष विक्रम पावसकर, मकरंद देशपांडे, शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संंग्रामसिंह देशमुख, नीता केळकर, जिल्हा बँकेचे संचालक राहुल महाडीक, ग्रामीण जिल्हाध्यक्ष सम्राट महाडीक उपस्थित होते.
दमदाटी सहन करणार नाही : सम्राट महाडीकजयंत पाटील आम्हांला दमदाटी केली तर मी ही वाळवा तालुक्यातीलच आहे. तुमची नितीमत्ता काय? मिरज दंगल कुणामुळे घडली, कुणाचे फोन गेले, या खोलात जायला लावू नका, असा इशारा जिल्हाध्यक्ष महाडीक यांनी दिला. पडळकर तुम्ही वाळवा तालुक्यातील कुठल्या गावात जाणार आहे, ते सांगा, तुम्हांला वाजत-गाजत नेतो, असे आव्हानही त्यांनी दिले. चंद्रकांतदादा जे बोलले त्यांचे करेक्ट बघा, मात्र जे बोलले तेे मान्य आहे का? असा प्रश्न जयंत पाटील यांना केला. त्यामुळे जयंत पाटलांनी राजीनामा द्यावा. आमच्या नेते मंडळींना चुकीचे बोलला तर सहन करणार नाही.
पालकमंत्री पाटील म्हणाले, सांगलीत विरोधकांनी महाराष्ट्र संस्कृती बचाव सभेच्या निमित्ताने जो प्रकार केला, त्याला रिअॅक्शन नाही, पण उत्तर द्यावे लागेल. त्यासाठी दि. १ रोजी सायंकाळी इशारा सभा घेणार आहोत. त्या सभेत विरोधकांच्या भाषणाच्या क्लिप दाखवणार आहोत. मला एकादशीला मटण खायला आवडेल, असे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या. त्यातून १८ लाख वारकर्यांची चेष्टा केली. ती क्लिप दाखवली जाईल. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी इस्लामपूर येथील सभेत काय भाषण केले होते. त्याला जयंतराव टाळ्या देत होते. ते मिटकरी आता आमच्या मांडीला मांडी लावून बसतात. पण त्यावेळी ते कोणत्या पक्षात होते? जयंतरावांनी मिटकरींच्या बोलण्याला विरोध का केला नाही?
आ. गोपीचंद पडळकर यांनी जे वाक्य वापरले त्याची चिंता महाराष्ट्राचे भाजप नेते देवेंद्र फडणवीस करतील. ते तेवढे खंबीर आहेत. भल्याभल्या माणसांना ते ’टॅकल’ करतात. ते पडळकर यांचा कान धरतील. मी प्रदेशाध्यक्ष असताना पडळकर यांनी सोलापूर येथे शरद पवार म्हणजे महाराष्ट्राला लागलेला कोविडचा विषाणू आहे, असे म्हटले होते. ते देवेंद्र फडणवीस यांनी ऐकले. पत्रकार परिषद आटोपून बाहेर येण्याची ते वाट पहात होते. पत्रकार परिषद झाल्यानंतर फडणवीस यांनी पडळकर यांना फोन करून यापुढे शरद पवार यांना असे बोलायचे नाही, असे सांगितले होते. पण इस्लामपुरात मिटकरींचा कान कोणी पकडला का? जयंतराव तर टाळ्या देत होते. गोपीचंद पडळकर काय बोलले याचा स्वतंत्र विचार करू. त्यांना करेक्ट करण्याची व्यवस्था आहे. पण पडळकर बोलले म्हणून फडणवीस यांच्यावर आगपाखड का, असा सवाल पाटील यांनी केला.
