- पालकमंत्री चंद्रकांत पाटील
- एनएसएस युनिटच्यावतीने “स्वच्छता ही सेवा” अभियान
सांगली / प्रतिनिधी
“माझे घर, माझी कॉलनी, माझा गाव, माझी शाळा, माझे महाविद्यालय आणि माझे कार्यालय या भावनेने ते स्वच्छ ठेवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. परिसराबरोबरच प्रत्येकाने वैयक्तिक स्वच्छता राखणे अत्यंत आवश्यक असून, स्वच्छता ही एकप्रकारे देशसेवा असल्याचे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे केले.
भारत सरकार, युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय आणि उच्च व तंत्र शिक्षण विभाग, राष्ट्रीय सेवा योजना कक्ष महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीमती मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालय येथे आयोजित “स्वच्छता ही सेवा” अभियान अंतर्गत “एक दिन, एक घंटा, एक साथ” राष्ट्र स्वच्छता अभियानाच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी संस्थेच्या अध्यक्ष लताताई देशपांडे, उपाध्यक्ष स्मिता केळकर, विभागीय सहसंचालक कार्यालयाचे प्रशासकीय अधिकारी विलास कदम, प्राचार्य डॉ. अनिल सुगते, उपप्राचार्य डॉ. नंदिनी काळे, कार्यवाह यशश्री आपटे, मा. पालकमंत्री महोदयांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव आदि उपस्थित होते.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, सेवा पंधरवड्यामध्ये दिनांक १७ सप्टेंबर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस ते २ ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती या कालावधीत स्वच्छतेचे कार्यक्रम, आरोग्य शिबिरे, गरीब वस्त्यांमध्ये जावून आर्थिक मदत करणे, असे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या अंतर्गत स्वच्छतेचा कार्यक्रम घेण्यात येत असून, या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवला जाणार आहे. आज आपण पंडीत दीनदयाळ उपाध्याय जयंती अंत्योदय दिवस म्हणून साजरा करत असल्याचे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, एनएसएसच्या माध्यमातून विविध प्रकारचे उपक्रम गावागावांमध्ये राबविले जातात.
यामधून समाजातील सद्यस्थिती लक्षात कळते व भविष्यात समाज हितासाठी निर्णय केले जातात. या माध्यमातून राष्ट्रीय सेवा युनिट चांगला नागरिक तयार होण्यासाठी मदत करते. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थितांना स्वच्छतेची प्रतिज्ञा दिली व परिसरात स्वच्छता केली. यावेळी त्यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. प्रास्ताविकात प्राचार्य डॉ. अनिल सुगते यांनी सविस्तर माहिती दिली. या कार्यक्रमास शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

