yuva MAharashtra एससी, एसटी जातीच्या दाखल्यांसाठीची ५० वर्षाच्या पुराव्याची अट रद्द करा

एससी, एसटी जातीच्या दाखल्यांसाठीची ५० वर्षाच्या पुराव्याची अट रद्द करा

सांगली टाईम्स
By -

 

पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील याना निवेदन देताना भाजपच्या सांगली जिल्हा सरचिटणीस गीताताई सूरज पवार. 

- गीताताई पवार यांचे पालकमंत्र्यांना साकडे 
- आतापर्यंत २३०० जातींच्या दाखल्यांचे वाटप

सांगली । प्रतिनिधी

अनुसूचित जाती-जमाती, भटक्या जमातींसाठी जातीचा दाखला काढण्यासाठी ५० वर्षापूर्वीचा पुरावा मागितला जातो. या जाचक अटीमुळे अनेकांना दाखला मिळण्यास अडचण होते. ही अट रद्द करावी अशी मागणी भाजपच्या जिल्हा सरचिटणीस गीताताई पवार यांनी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे केली आहे. दरम्यान आतापर्यत माकडवाले, वडर, धनगर आदी भटक्या विमुक्त जातींच्या 2300 दाखल्यांचे वाटप केले आहे. यासाठी वेळोवेळी जिल्हा प्रशासनाच्या मदतीने शिबीरे घेतली आहेत.याशिवाय अनेक तृतीयपंथीयांनाही मतदान, रेशनकार्ड मिळवून दिले आहे, अशी माहिती गीताताई पवार यांनी दिली.

जातीच्या दाखल्यांसाठी ५० वर्षाच्या पुराव्याची अट म्हणजे व्यक्तीने त्याच्या पूर्वजांनी १९६७ पूर्वीपासून महाराष्ट्रामध्ये वास्तव्यास असल्याचा पुरावा सादर करावा लागतो. ज्या घरांमध्ये शैक्षणिक वातावरण नाही. ते इतर राज्यांमधून स्थलांतरीत झाले, त्यांची या अटीने मोठी अडचण झाली आहे. असा पुरावा आणायचा कुठून? असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. ही अट रद्द करावी याबाबत शासन स्तरावर अनेक बैठका झाल्या. मात्र सकारात्मक निर्णय होत नसल्याचे सांगत पवार म्हणाल्या, नोकरी, शैक्षणिक, राजकिय कामांसाठी अडथळे येतात. विशेषतः विद्यार्थ्यांचे या अटीमुळे मोठे नुकसान होते. ही अट रद्द करावी अशी मागणी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली आहे.

दरम्यान गेल्या काही महिन्यात भटक्या व विमुक्त जातींच्या दाखल्यांसाठी जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने अनेक शिबीरे घेतली आहेत. यामाध्यमातून जवळपास २३०० जातींच्या दाखल्यांचे वाटप करण्यात आले आहे. यामध्ये वडार, माकडवाले, धनगर, डवरी आदी भटक्या व विमुक्त जाती-जमांतीचा समावेश आहे. या अनुशंगाने आता अनुसूचित जाती-जमाती समाजातीलही लोक जातींच्या दाखल्यांसाठीची मागणी होत आहे. पण ५० वर्षापूर्वीच्या वास्तव्याचा पुरावा ही अट अडचण ठरु लागली आहे. नागरिकांच्या या मागणीची दखल घेत पालकमंत्र्यांना निवेदन दिले आहे. यासाठी सकारात्मक पाठपुरावा करु अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली आहे. असे पवार यांनी सांगितले.

Tags: