- जिल्हाधिकारी अशोक काकडे
- शिराळा येथे आढावा बैठकीत सूचना
सांगली / प्रतिनिधी
जागतिक पर्यटनाच्या क्षितिजावर शिराळा व चांदोली नावारूपाला येण्यासाठी संबंधित सर्व विभागांनी विहित कालमर्यादा ठरवून सर्वसमावेशक पर्यटन आराखडा तयार करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी दिले. शिराळा तहसील कार्यालयात जागतिक पर्यटन दिन व चांदोली पर्यटनाबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.
यावेळी आमदार सत्यजित देशमुख, प्रांतधिकारी श्रीनिवास अर्जुन, तहसीलदार शामला खोत पाटील यांच्यासह इतर सर्व विभागांचे प्रमुख उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी काकडे म्हणाले, सर्व विभागांनी चांदोलीचा विकास डोळ्यासमोर ठेवून आराखडा तयार करावा. यामध्ये 20 टक्के शासन 80 टक्के खासगी गुंतवणूक असेल. पर्यटन विकासासाठी लागणारी जमीन, प्रशिक्षणसाठी येणारा खर्च यांचा प्रामुख्याने विचार करावा. स्थानिक युवकांना रोजगार संधी निर्माण करण्यासाठी योजना आखा, असे त्यांनी यावेळी सांगितले.
आमदार सत्यजित देशमुख म्हणाले, शेवताई, झोळंबी, तांबवे, उदगिरी येथे ट्रेकिंग सुविधा व मेडिटेशन केंद्र व जनीचा आंबा ते कंदहार धबधब्यापर्यंत बोटिंग सुरु करावे. पर्यटनाला चालना देण्यासाठी डिसेंबर ते मे महिन्यादरम्यान कमीत कमी चार वेळा चांदोली महोत्सवाचे आयोजन करावे. शिराळा येथे भुईकोट किल्ला येथे उभारण्यात येणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकात त्यांचा जीवन पट व त्यांची माहिती लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी लाईट शो व साऊंड शो उभारावा.
यावेळी इको टुरिझम, जंगल सफारी, पायवाट, पक्षी निरीक्षण ठिकाण, पर्यटकांच्यासाठी माहिती केंद्र, शिराळा, चांदोली, इस्लामपूर, कराड येथे सुरु करणे, गाईडसाठी प्रशिक्षण, ऑनलाईन बुकिंग सुविधा. पर्यटकांसाठी तंबू, होम स्टे या ठिकाणाचा शोध घेणे, कृषी पर्यटन साठी शेडगेवाडी ते चांदोली पर्यंत ठिकाण शोधणे, निसर्ग भटकंतीसाठी रोप वे, ट्रॅकिंग मार्ग, चांदोलीकडे येणाऱ्या पर्यटकांच्यासाठी सांगली-कोल्हापूर-रत्नागिरी-सातारा हा रस्ता चांगले करणे, या मार्गांवर ठीक ठिकाणी दिशादर्शक बोर्ड लावणे, पार्किंग, स्थानिक खाद्य पदार्थ, लोककला, सांस्कृतिक कार्यक्रम, उद्योगसाठी लागणारे कर्ज पुरवठा करणे. पर्यटनाशी निगडित असणाऱ्या योजनाची माहिती संकलित करणे, शिराळा तांदूळ, नाचणी, आंबा, फणस, देशी पावटा यांची शेती विकसित करणे, शिराळा नागपंचमी, अंबाबाई, गोरक्षनाथ, हनुमान मंदिर, गिरजवडे जोतिबा मंदिर, शेवताई मंदिर येथे पर्यटन वाढ करणे, वॉटर ए.टी.एम, शौचालय सुविधा, सांडपाणी शुद्धीकारण योजना, ई रिक्षा, डिजिटल मार्केटिंग सुविधा, महिलांना कॅन्टीन, कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस यंत्रणा याबाबत चर्चा करण्यात आली.
![]() |
| Advt. |
सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कोल्हापूरचे क्षेत्रसंचालक तुषार चव्हाण म्हणाले, महाबळेश्वर ते राधानगरी पर्यंत सह्याद्रीच्या पट्ट्यात पूर्वापारपासून वाघाचा संचार आहे. आता सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात तीन वाघ असून अजून 8 वाघ सोडण्यात येणार आहेत. त्यापैकी डिसेंबर महिन्यात पहिल्या टप्यात पेंच व ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातून दोन वाघीण आणण्यात येणार आहेत. त्यासाठी ऑपरेशन ‘तारा’ राबविण्यात येणार असल्याने ताडोबा व पेंच प्रमाणे आपला सह्याद्री प्रकल्प होण्यास मदत होईल. त्यामुळे प्रकल्पात वाघाचे दर्शन दुर्मिळ राहणार नाही. सध्या वाघांना अन्नाची कमतरता भासणार नाही. वाघाला जंगलाचा अधिवास लागतो. तो जंगल मार्गाने जातो. बिबट्या प्रमाणे जंगल सोडून बाहेर जात नाही. वाघाची संख्या वाढल्यास पर्यटनाला चांगला वाव मिळणार आहे. लोकांची उपजीविका वाढेल. पर्यटकांना माहिती देण्यासाठी स्थानिक लोकांना गाईड म्हणून प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

