- पृथ्वीराज पाटील
- खासदारांची सोयीनुसार भूमिका
- विश्वासघात झाल्यानेच काँग्रेस सोडली
सांगली : प्रतिनिधी
खासदार विशाल पाटील सोयीनुसार भूमिका बदलतात. कधी अपक्ष तर कधी काँग्रेसचा आहे म्हणतात. खासदारकीच्या निवडणुकीत काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले. पण विधानसभा निवडणुकीत ते काँग्रेसच्या उमेदवाराच्या मागे उभा न राहता, घरातील उमेदवाराच्या पाठीशी राहिले. दोनदा माझा विश्वासघात झाल्यानंतर आता तिसऱ्यांदा विषाची परीक्षा कोण घेणार, असा सवाल करून, यापुढेही असा विश्वासघात होणारच नाही, याची कसलीही हमी घ्यायला पक्षातील कुणीच तयार नसल्यामुळे, मग मी पक्षातून बाहेर पडलो, असा खुलासा पृथ्वीराज पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला.
काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष असणाऱ्या पृथ्वीराज पाटील यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर प्रथमच भूमिका मांडली. ते म्हणाले, माझे वडीलही याच राजकीय संघर्षातून गेले. त्यांनाही तेव्हा राजकीय त्रास झाला. राजकारण, अंतर्गत मतभेद विसरून पक्षासाठी योगदान देत होतो, दहा वर्षे कुचंबणा सहन केली. किती वर्षे कुचंबणा सहन करायची? कितीदा विश्वासघात करून घ्यायचा? शेवटी त्यांना काँग्रेस मोकळी सोडली आणि मी पुढे गेलो, अशी भावना पाटील यांनी व्यक्त केली.
पाटील यांच्या विजयासाठी आपणही प्रामाणिक प्रयत्न केले. त्यानंतर आमदारकीवर आपला हक्क असताना त्यांनी त्यांच्या घरातून होणारी बंडखोरी रोखावी, अशी अपेक्षा असताना ते बंडखोरांमागे उभे राहिले. २०१९ आणि २०२४ च्या निवडणुकीत झालेला विश्वासघात २०२९ मध्ये होणारच नाही, याची हमी कोण घेणार? ते तर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचेही ऐकत नाहीत. दोनदा तुमचा पराभव झाला आहे. आता तिसऱ्यांदा तुम्हाला विरोध करू, असे उघडपणे मला सांगण्यात आले. आमदार डॉ. विश्वजित कदम यांच्याशीही मी याबाबत चर्चा केली, पण विश्वासघात होणारच नाही, याची हमी घेण्याची तयारी कोणीच दाखवली नाही, असे पाटील यांनी सांगितले.
