yuva MAharashtra जिल्हा प्रशासन पुरपट्टयात ; यंत्रणा सतर्क

जिल्हा प्रशासन पुरपट्टयात ; यंत्रणा सतर्क

सांगली टाईम्स
By -



- जिल्हाधिकारी, आयुक्तांकडून पुरपट्ट्याची पाहणी

- नागरिक, यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सूचना

कोयना, वारणा धरण क्षेत्रासह परिसरात पावसाने जोरदार कोसळायला सुरवात केल्याने सांगलीसह परिसरात पुराची धास्ती निर्माण झाली आहे. येथील आयर्विन पुलाजवळ पाण्याची पातळी २१ फुटापर्यंत गेली आहे. यामुळे प्रशासन सतर्क झाले आहे. जिल्हाधिकारी अशोक काकडे, महापालिका आयुक्त सत्यम गांधी, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांच्यासह अधिकाऱ्यांनी पुरपट्टयात भेट देत पाहणी केली. नागरिकांना सतर्क राहण्याचा सूचना केल्या.

गेल्या दोन दिवसांपासून सांगलीत पावसाने चांगलाच जोर धरला आहे. कोयना, वारणा धरण क्षेत्राच्या परिसरात संततधार सुरू आहे. दोन्ही धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग वाढविण्यात आला आहे. त्यामुळे सांगलीला पुन्हा एकदा पुराचा धोका निर्माण झाला आहे. कृष्णा, वारणा काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान संभाव्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा, मनपा प्रशासनही सतर्क झाले आहे.

मंगळवारी जिल्हाधिकारी अशोक काकडे, महापालिका आयुक्त सत्यम गांधी, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांनी कृष्णाकाठावरील पुरपट्ट्यातील परिसराची पाहणी केली. नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या.  यावेळी मिरजचे उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकर, सांगलीच्या अप्पर तहसिलदार अश्विनी वरुटे, महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. रविंद्र ताटे, महापालिका कार्यकारी अभियंता पृथ्वीराज चव्हाण, एनडीआरएफचे इन्स्पेक्टर सुशांत शेट्टी आदि उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आपत्ती काळात करावयाच्या उपाययोजना व घ्यावयाची काळजी या संदर्भात योग्य ते निर्देश यंत्रणांना दिले. 

संभाव्य पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासन सर्व बाजूंनी सज्ज असल्याचे सांगून जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, महानगरपालिका, महसूल यंत्रणा, जलसंपदा विभाग, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, पोलीस विभाग तसेच, आरोग्य विभाग या सर्व विभागांकडून वेळोवेळी नागरिकांना मदत देण्यात येईल. सूर्यवंशी प्लॉट, इनामदार मळा, मगरमच्छ कॉलनी या भागातील नागरिकांनी सतर्क राहावे. संभाव्य पूरपरिस्थितीत शासकीय यंत्रणा कार्यान्वित होऊन नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. 
नागरिकांच्या सेवेसाठी प्रशासन सज्ज असून नागरिकांनीही प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करून जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी यावेळी नागरिकांनी केवळ शासकीय यंत्रणा व संकेतस्थळावरील माहितीवर लक्ष ठेवून दक्ष राहावे, कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले. चांदोली आणि कोयना धरण पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे धरणाच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. या अनुषंगाने धरणाची पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी दोन्ही धरणांतून विसर्ग वाढवण्यात आला आहे. त्यामुळे कृष्णा आणि वारणा नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत असून नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. या अनुषंगाने प्रशासन सतर्क असून, सर्व यंत्रणा परस्पर समन्वय ठेवून आहेत.
Tags: