◼️प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आज सांगलीत
◼️युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोज सरगर यांच्यासह अनेकांचा पक्ष प्रवेश
सांगली । प्रतिनिधी
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीच्या अनुशंगाने भारतीय जनता पक्षाने संघटनात्मक बांधणीवर भर दिला आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण सोमवारी पहिल्यांदाच सांगली दौर्यावर येत आहेत. युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोज सरगर यांच्यासह महापालिका क्षेत्रातील काही माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा मोठा पक्ष प्रवेश त्यांच्या उपस्थितीत होणार आहे. याची जय्यत तयारी झाली आहे. या निमीत्ताने भाजपा सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेच्या निवडणूकीचे रणशिंगही फुंकणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीचा मार्ग मोकळा झाल्यानंतर सांगली जिल्ह्यातील राजकारण तापले आहे. प्रत्येकाची पाऊले सत्तेकडे वळू लागली आहेत. याची मोठ्या प्रमाणावर झळ काँग्रेसला बसली आहे. काँग्रेसच्या नेत्या तथा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर महापालिका क्षेत्रातील काँग्रेस खिळखिळी झाली आहे. यातच काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटीलही काँग्रेसच्या वाटेवर आहेत. त्यात भरीस भर म्हणून खासदार विशाल पाटील यांचे कट्टर समर्थक तथा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोज सरगर यांनीही भाजपची वाट धरली आहे. खासदार विशाल पाटील यांचा विश्वासू समर्थक म्हणून सरगर यांची ओळख आहे. लोकसभा निवडणूकीत त्यांनी खासदार पाटील यांच्यासाठी अहोरात्र काम केले.
![]() |
| Advt. |
खासदारांच्या घर असलेल्या प्रभागातून ते नगरसेवकही होते. खासदारांच्या माध्यमातून त्यांना युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदाची लॉटरीही लागली होती. सांगलीतील प्रभाग क्रमांक ११ व ९ मध्ये सरगर यांची ताकद आहे. याशिवाय संपूर्ण जिल्हाभरामध्ये त्यांच्याकडे युवकांची मोठी फळी आहे. दरम्यान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत सरगर यांच्यासह त्यांचे समर्थक सोमवारी भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. या निमीत्ताने भाजपा सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेच्या निवडणूकीचे रणशिंगही फुंकण्याची शक्यता आहे. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार डॉ. सुरेश खाडे, जयश्रीताई पाटील यांच्यासह भाजपाचे दिग्गज नेते या पक्ष प्रवेशासाठी उपस्थित राहणार आहेत. यामुळे या पक्ष प्रवेश सोहळ्याकडे समस्त भाजपा कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

