yuva MAharashtra अखेर पृथ्वीराज पाटलांच ठरलं..!

अखेर पृथ्वीराज पाटलांच ठरलं..!

सांगली टाईम्स
By -

◼️ बुधवारी भाजप प्रवेश निश्चित

सांगली / प्रतिनिधी
सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांचा बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित भाजप प्रवेश होणार आहे.  विधानसभा निवडणुकीत काँग्रेसअनंतर्गत बंडाळीतून त्यांचा पराभव झाला होता. तेंव्हापासून ते पक्षावर नाराज होते. भाजपाच्या संपर्कात होते. परंतु त्यांच्या भाजप प्रवेशाचे घोडे अडले होते. अखेर  त्यांच्या भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब झाले आहे.

पाटील यांनी अत्यंत कठीण काळात काँग्रेसशी निष्ठा राखत पक्ष संघटन मजबूत केले होते. पक्षीय कार्यक्रम, आंदोलन, विविध सामाजिक, आरोग्य, शैक्षणिक, क्रीडा उपक्रम राबवत पक्ष जिवंत ठेवला होता. याच जोरावर त्यांनी सांगली विधानसभा मतदार संघातून दोन वेळा निवडणूक लढवली. परंतु पक्षांतर्गत शहकाटशहाच्या राजकारणामुळे त्यांना पराभव स्वीकारावा लागला. स्थानिक काँग्रेस नेत्यांकडून त्यांना सातत्याने डावलण्यात आले. पक्षातूनच मोठा विरोध असल्याने पाटील नाराज होते. त्यात यंदाचा पराभव त्यांच्या खूपच जिव्हारी लागला होता. काँग्रेसच्या नेत्या जयश्रीताई पाटील यांनी बंडखोरी केल्यामुळे आमदारकीचा घास त्यांच्यापासून हिरवला गेला. याची खंत त्यांना होती.

ताकदीचा नेता काँग्रेसने गमावला
शांत, संयमी आणि निष्कलंक नेता म्हणून पृथ्वीराज पाटील यांची ओळख आहे. अत्यंत निष्ठेने त्यांनी काँग्रेस वाढवली. पक्ष जिवंत ठेवण्याचे काम केले. पक्षांतर्गत विशेषतः दादा घराण्याकडून त्यांना अपेक्षित साथ मिळाली नाही. काम करताना अनेक अडचणींचा त्यांना सामना करावा लागला. आमदारकीचा घास पक्षांतर्गत कुरघोड्यामुळेच त्यांना खाता आला नाही. परिणामी त्यांनी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या रूपाने काँग्रेसने एक चांगला, ताकदीचा नेता गमावला, अशी चर्चा जिल्हाभरात सुरू आहे. 
त्यामुळे ते गेल्या काही महिन्यापासून भाजप नेत्यांच्या संपर्कात होते. भाजप प्रवेशाबाबत त्यांच्या अनेकवेळा चर्चाही झाल्या होत्या. मात्र ठोस निर्णय होत नव्हता. त्यात भरीस भर म्हणून जयश्रीताई पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने त्यांची अधिकच राजकीय कोंडी झाली होती. पण अखेर त्यांच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त निघाला आहे. बुधवार १३ ऑगस्ट रोजी ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांच्या भाजप प्रवेशाने सांगलीत काँग्रेसला मोठा धक्का बसू शकतो. काँग्रेसचे संपूर्ण अस्तित्वच संपणार आहे.


Tags: