सांगली / प्रतिनिधी
शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. अधिवेशन काळात त्यांनी कॅन्टिन चालकाला मारहाण केली होती. ही घटना ताजी असतानाच आता त्यांनी ‘उबाठा’चा बाप काढला आहे. गायकवाड यांच्या या वक्तव्यावरुन पुन्हा एकदा राजकारण तापण्याची शक्यता आहे.
शिवसेनेचे आमदार, मंत्री सातत्याने वादाच्या भोवर्यात सापडत आहेत. समाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, रोजगार हमी मंत्री भरतशेठ गोगावले, गृहराज्यमंत्री योगेश कदम, आमदार संजय गायकवाड हे विरोधकांच्या रडारवर आहेत. या मंत्र्यांची सरकारमधूल हकालपट्टी झाली पाहिजे अशी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मागणी आहे. या मागणीसाठी पक्षाच्या वतीने सोमवारी राज्यभरात जन आक्रोश आंदोलन करण्यात आले. मुंबईत स्वतः ठाकरे यांनी राज्य सरकार आणि भ्रष्ट मंत्र्यांच्या विरोधात ठाकरी बाण सोडले. याबाबत आमदार गायकवाड यांना विचारले असता, त्यांनी वादग्रस्त वक्तव्य करत वाद निर्माण केला आहे.
ते म्हणाले, विरोधकांना काहीही काम राहिलेले नाही. रिकामचोट विरोधीपक्ष राहिलेला आहे. लोकांच्या प्रश्नावर, शेतकरी, कष्टकर्यांच्या प्रश्नांवर विरोधकांनी बोलायला हवे. पण विरोधाला विरोध म्हणून करण्याचे काम सुरु आहे. माझी कॉपी करायला त्यांना दहा जन्म घ्यावे लागेल. मी ओरिजन आहे. माझी कॉपी करणे उबाठाच्या बापालाही जमणार नाही, असे म्हणात नव्या वादाला तोंड फोडले आहे. गायकवाडांच्या या वक्तव्याचे पडसाद उमटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षांकडून या वक्तव्यासंदर्भात काय प्रतिक्रिया उमटते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
