◼️ स्वाभिमानी आंबेडकर समाजाची मागणी
◼️ जिल्हाधिकार्यांना निवेदन
सांगली । प्रतिनिधी
महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचा हेतुपुरस्पर अपमान करणार्या पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांच्यासह उपायुक्तांच्यावर अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करावा. सेवेतून निलंबीत करावे अशी मागणी स्वाभिमानी आंबेडकरी समाजाचे संस्थापक डॉ. महेशकुमार कांबळे यांच्यासह शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
जिल्हाधिकारी काकडे यांना दिलेल्या निवेदनामध्ये असे म्हंटले आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिकेचा सुधारीत विकास आराखडा रद्द करण्यासाठी जन आक्रोश आंदोलन झाले. महापालिका क्षेत्रातील सर्व लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार तसेच ५० हजार नागरिकांनी या आराखड्यास हरकत घेतली आहे. या मोर्चावेळी निवेदन देण्यासाठी विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे हे आले होते. पण त्यांना अर्धा तास थांबावे लागले. आयुक्त, उपायुक्त निवेदन स्विकारण्यास आले नाहीत.
आयुक्तांसह उपायुक्तांनी जाणीवपूर्वक बनसोडे यांचा अपमान केला आहे. या प्रकरणी त्यांच्यावर अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत कारवाई करावी. दोघांनाही सेवेतून निलंबीत करावे अशी मागणी करण्यात आली आहे. दोन्ही अधिकार्यांवर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही या निवेदनामध्ये देण्यात आला आहे. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील खांडेकर, जिल्हा महासचिव कविश कांबळे, मिरज तालुकाध्यक्ष देवदास कांबळे आदी उपस्थित होते.
