◼️ २५ हजार शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा
सांगली / प्रतिनिधी
शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना २.० मधून शेतकऱ्यांचे दिवसा वीजपुरवठा करण्याचे स्वप्न पूर्ण होत आहे. सांगली जिल्ह्यात 103 ठिकाणी एकूण 679 मेगावॅट क्षमतेचे विकेंद्रित सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार असून याद्वारे शेतीला दिवसा वीजपुरवठा होणार आहे. सध्या 13 ठिकाणांवरील एकूण 85 मेगावॅट क्षमतेचे ऊर्जा प्रकल्पांचे काम पूर्ण झाले असून यातून 24,243 शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा होत आहे. या योजनेच्या कामांना आणखी गती द्यावी असे निर्देश महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री.लोकेश चंद्र यांनी दिले.
सांगली जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनीच्या जिल्हास्तरीय टास्क फोर्सची आढावा बैठक झाली. यावेळी श्री.लोकेश चंद्र बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अप्पर जिल्हाधिकारी श्री.सुशांत खांडेकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.तृप्ती धोंडमिसे, पोलीस अधीक्षक श्री.संदीप घुगे, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या स्वतंत्र संचालिका श्रीमती नीता केळकर, सल्लागार श्री.श्रीकांत जलतारे, पुणे प्रादेशिक संचालक श्री.भुजंग खंदारे, कोल्हापूर परिमंडल कार्यालयाचे मुख्य अभियंता श्री.स्वप्नील काटकर, विशेष कार्य अधिकारी श्री.मंगेश कोहाट, विद्युत निरीक्षक संजय राठोड आदी मान्यवर उपस्थित होते.
स्वागत सेलचे स्वतंत्र पोर्टल - श्री. लोकेश चंद्र
यावेळी श्री.लोकेश चंद्र यांनी जिल्ह्यातील विविध औद्योगिक संघटना सोबत संवाद साधला. स्वागत सेलची स्वतंत्र स्वागत सेल पोर्टल करण्यात येत असून सर्व उद्योग संघटनांना त्यांचे स्वतंत्र आयडी पासवर्ड देण्यात येणार आहे. यामध्ये उद्योजक त्यांच्या समस्या व अपेक्षा मांडू शकतात . याचा आढावा मुख्यालय स्तरावरून नियमित घेतला जाणार आहे. उदयॊग व महावितरण एकत्र येऊन काम केले तर त्यांच्या समस्या लवकर सुटतील , याकरताच स्वागत सेल व पोर्टल केले आहे. राज्याचा उद्योग लोड दरवर्षी 6 टक्के वाढते हे गृहीत धरून महावितरणने नियोजन केले आहे तसेच नवीकरणीय ऊर्जेचा राज्यातील सर्व ग्राहकांना फायदा मिळणार असे लोकेश चंद्र यांनी यावेळी सांगितले.
अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री.लोकेश चंद्र म्हणाले की, मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने सुरू झालेली मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना २.० ही जगातील सर्वात मोठ्या विकेंद्रीत सौर ऊर्जा प्रकल्पांची साखळी आहे. यातून पुढील एक वर्षात १६ हजार मेगावॅट विजेचा शेतीला दिवसा पुरवठा करण्यात येणार आहे. लोकसंवाद व सहकार्यातून या योजनेला गती देण्यासाठी टास्क फोर्सने पुढाकार घ्यावा. तसेच सौर प्रकल्पांसाठी आवश्यक शासकीय व खाजगी जमीन उपलब्ध करून घेणे, भूसंपादन करणे व सौर प्रकल्पांसाठी आवश्यक पायाभूत सेवेत सुधारणा करण्याचे कामांना गती देण्यात यावी असे निर्देश श्री. लोकेश चंद्र यांनी दिले. यावेळी सौर योजनेच्या अनुषंगाने वीज वितरण जाळे सक्षमीकरण करा, नवीन जोडणीची तसेच इतर सर्व कामे एसओपी नुसार करा, थकबाकीसह वीजवसुली करा, वीजचोरीवर कारवाई करा अशाही सूचना श्री.लोकेश चंद्र यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.
