![]() |
| सतेज उर्फ बंटी पाटील |
◼️ जिल्ह्यात काँग्रेसची वाताहात
◼️ कार्यकर्ते हवालदिल
सांगली / प्रतिनिधी
कोल्हापूरांचा विषय लय हार्ड असे नेहमीच म्हटले जाते. दोस्त तर दोस्त, नाही तर प्रखर दुश्मनी कोल्हापुरात पाहायला मिळते. राजकारणात पाटील विरुद्ध महाडिक असा तुल्यबळ सामना होत असतो. महाडिक सद्या सत्तेत. पण काँग्रेसच्या बंटी पाटलांनी त्यांना शिंगावर घेतले आहे. सांगलीत मात्र या उलट स्थिती आहे. तुल्यबळ भाजपला अंगावर घ्यायला एकही काँग्रेसचा नेता तयार नाही. माजी मंत्री विश्वजित कदम या एकमेव नेत्यांकडून काँग्रेस कार्यकर्त्यांना अपेक्षा होती. मात्र ती फोल ठरली आहे. दुसरीकडे खासदार विशाल पाटील यांच्या विश्वहर्तेवरच प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळे जिल्ह्यातील काँग्रेसचे वाटोळे झाले आहे. जिल्हा काँग्रेसला नवसंजीवनी द्यायची असेल तर बंटी पाटलांसारखा नेता जिल्हा काँग्रेसला हवा अशी चर्चा काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे.
सांगली जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला. स्व. पदभूषण वसंतदादा पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषविले. राज्यपाल पदापर्यंत मजल मारली. वसंतदादा घराणे काँग्रेसचे एकनिष्ठ. स्व. पतंगराव कदम काँग्रेसचे धडाकेबाज नेते. त्यांनीही जिल्ह्यात काँग्रेस चांगलीच रुजवली. काँग्रेस म्हणजे सांगली असे जणू समीकरणच तयार झाले होते. परंतु २०१४ पासून जिल्हा काँग्रेस बॅकफुटवर गेली आहे. काँग्रेसची पूर्णपणे वाताहात झाली आहे. याची अनेक कारणे आहेत. काँग्रेसच्याच जीवावर मोठे झालेले अनेक नेत्यांनी काँग्रेसला रसातळाला नेण्याचे काम केले आहे. बॅकफुटवर गेलेली काँग्रेस ११ वर्षानंतरही अद्याप सावरलेली नाही. नेत्यांमधील गटबाजीमुळे काँग्रेसचे वाटोळे झालेच पण कार्यकर्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. खणखर नेतृत्वच नसल्याने कार्यकर्ते भाजपवाशी होऊ लागले आहेत.
कार्यकर्ते लढवय्ये; नेते पळपुटे
कोल्हापूरमध्ये सतेज उर्फ बंटी पाटील यांनी आख्खी भाजपा अंगावर घेतली आहे. नेटाने ते काँग्रेसची खिंड लढवत आहेत. समोर प्रबळ विरोधक असतानाही त्यांनी तलवार खाली ठेवलेली नाही. या उलट सांगली काँग्रेसमधील नेत्यांची स्थिती आहे. खासदार पाटील, आमदार कदम यांच्यासह प्रमुख नेत्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडले आहे. कार्यकर्ते लढायला तयार असताना नेते मात्र पळपुटेपणाची भूमिका वठवट आहेत. आम्हालाही एकदा सतेज उर्फ बंटी पाटील यांच्यासारखा खमक्या नेता मिळायला हवा होता अशी चर्चा काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे.
सांगली शहर काँग्रेसमध्ये पृथ्वीराज पाटील यांनी शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. परंतु तेही पक्षांतर्गत राजकारणाचे बळी ठरले. स्थानिक काँग्रेस नेत्यांच्यामुळे त्यांचा दोन वेळा पराभव झाला. आता वसंतदादा पाटील घराण्यातील विशाल पाटील अपक्ष खासदार आहेत. लोकसभेत काँग्रेसचे सहयोगी खासदार अशी त्यांची ओळख असली तरी त्यांचे भाजप कनेक्शन मजबूत आहे. सद्या त्यांची खोबरे तिकडे चांगभल अशी भूमिका आहे. माजी मंत्री विश्वजित कदम यांच्याकडून काँग्रेसला उभारी मिळेल अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा होती. मात्र ती सपशेल फेल ठरली आहे. जयश्रीताई पाटील यांनी आता भाजपाचे कमळ हातात घेतले आहे. खासदार पाटील यांचे समर्थकही भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये हतबलता निर्माण झाली आहे. सक्षम नेतृत्व नसल्याने कार्यकर्त्यांची कोंडी झाली आहे.
