◼️पृथ्वीराज पवार
◼️ व्यापारी-प्रशासन समिती स्थापन करा
सांगली / प्रतिनिधी
सांगली, मिरज, कुपवाड शहर महापालिकेच्या हद्दीतील व्यापाऱ्यांना पाठविलेली बाजार परवाना नोटीस बिनशर्त मागे घ्यावी. व्यापारी आणि प्रशासनाची संयुक्त समिती स्थापन करून व्यवसाय, व्यापार वृद्धीसाठी विचार करावा, अशी मागणी भाजप नेते पृथ्वीराज पवार यांनी आज केली. याबाबतचे निवेदन आयुक्त सत्यम गांधी यांना दिले. कोल्हापूर शहराचा झपाट्याने विकास होत असताना सांगलीत व्यापार, व्यवसायिकांची कोंडी करणारी धोरणे का राबवत आहात, सांगलीला पुढे न्यायचे आहे की पायात बेड्या बांधून ठेवायचे आहे, असा सवाल त्यांनी यानिमित्ताने केला.
त्यांनी निवेदनात म्हटले आहे, की महापालिका क्षेत्रातील सर्व व्यावसायिक, व्यापारी यांना बाजार परवाना घ्या, अथवा दुकाने बंद करा, अशी धमकी वजा नोटीस महापालिकेने बजावली आहे. व्यापाऱ्यांनी व्यवसायासाठी केंद्र व राज्य शासन, महापालिकेचे सर्व परवाने आणि कर शुल्क भरत असुनही अशा अनावश्यक कराचा नोटीसा बजावल्या आहेत. गेल्या बैठकीत महापालिका दालनात व्यापारी, उद्योजक, वाहतूकदार, बांधकाम व्यावसायिक आणि आयुक्तंची संयुक्त बैठक झाली होती. तीत व्यापार, उद्योगातील समस्या आणि शहराच्या आर्थिक स्थितीवर पायाभूत सुविधा देण्याबाबत चर्चा झाली होती. महापालिका प्रशासन व व्यापारी, उद्योजक, व्यावसायिक यांची एक संयुक्त समिती स्थापन करण्याचा निर्णयही झाला होता. ही समिती आर्थिक विकासाचे पुढील धोरण ठरवेल, यावर एकमत झाले होते. तशी ग्वाही आयुक्तांनी दिली होती.
त्यानुसार लवकरात लवकर समिती स्थापन करुन आरोग्य विभागाकडील परवाना सहित अनावश्यक करांन बाबत माहिती घेवुन ते रद्द करणे तसेच आर्थिक चालना देणारे धोरण राबवणे अपेक्षित होते. परंतू, उलट करांचे नाव बदलून पुन्हा सक्तीचे धोरण राबवले जात आहे. मुळात प्रशासकीय महासभा, प्रशासकीय स्थायी समितीमध्ये घेतल्या जाणाऱ्या निर्णयांमधे सर्वसामान्य नागरिकांचे प्रतिनिधी नाहीत. ही आदर्श लोकशाहीची पायमल्ली करणारी बाब आहे. महापालिका प्रशासन व्यवस्थित चालावे, यासाठी प्रयत्न करणे, ही प्रशासक म्हणून आपली जबाबदारी आहे. शहराचा आर्थिक परिस्थितीवर दुरगामी परिणाम करणारे धोरण लोकनियुक्त प्रतीनिधींचा महासभेत होणेच रास्त आहे. प्रशासनाने एकतर्फी निर्णय करून ते लादले तर रस्त्यावर उतरून विरोध केला जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
