yuva MAharashtra भटकी कुत्री, जनावरांसाठी कोंडवाडा निर्माण करा

भटकी कुत्री, जनावरांसाठी कोंडवाडा निर्माण करा

सांगली टाईम्स
By -

◼️माजी आमदार नितीन शिंदे यांची मागणी

◼️मनपा आयुक्ताना निवेदन

सांगली / प्रतिनिधी 

सांगली महापालिका क्षेत्र भटकी कुत्री व भटकी जनावर मुक्त करण्यासाठी महापालिकेच्या वतीने कोंडवाडा (निवारागृह) नव्याने निर्माण करावा. अन्यथा भटकी कुत्री व जनावरांच्या हल्ल्यात नागरिक जखमी झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करू, असा इशारा माजी आमदार नितीन शिंदे यांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी मनपा आयुक्त सत्यम गांधी यांना दिले आहे. 

या निवेदनामध्ये, सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रामध्ये भटक्या कुत्र्यांनी व भटक्या जनावरांनी अक्षरशा धुमाकूळ घातलेला आहे. हजारोच्या संख्येने असणारी ही भटकी कुत्री दररोज लहान मुलांना, व अबालवृद्धांना दररोज हल्ले करून चावत असतात. या भटक्या कुत्र्यांच्यामुळे सांगली महानगरपालिका क्षेत्रातील नागरिक त्रस्त झाले आहेत. दररोज टू व्हीलर गाड्यांची सीट कव्हर फाडणे, फोर व्हीलर गाड्यांच्या वर चढून बसून गाडीवर नखाने ओरखडणे, लोकांच्या घरातील कचरा अस्ताव्यस्त करणे, ठिकठिकाणी त्यांच्या विस्टेमुळे लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे. या भटक्या कुत्र्यांच्यावर उपाय करण्यासाठी महापालिकेने राबवलेली नसबंदी मोहीम पूर्णपणे अपयशी ठरलेले आहे. नसबंदीच्या नावाखाली खोटी नसबंदी केलेली दाखवून महापालिकेची लूट होत आहे. 

त्याचबरोबर काही दिवसापूर्वी भटक्या जनावरांनी मारलेल्या शिंगामुळे एकाचा मृत्यू सुद्धा झालेला आहे. तसेच आपल्या आधी असलेले आयुक्त यांच्या गाडीचा अपघात सुद्धा भटकी कुत्री गाडीचा आडवे आल्यामुळे झाला होता.  या महिन्यातच सर्वोच्च न्यायालयाने भटक्या कुत्र्यांना निवारागृहात ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत. तसेच भटक्या कुत्र्यांना हटवण्यात अडथळा निर्माण करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थेविरोधात न्यायालयाचा अवमान केल्याची कठोर कारवाई करण्याचा इशारा न्यायालयाने दिलेला आहे. महापालिकाने तातडीने महापालिकेच्या असलेल्या शेकडो भूखंडांपैकी एक भूखंड कोंडवाडा तयार करून त्या ठिकाणी असलेली सर्व ही भटकी कुत्री व जनावरे पकडून कोंडवाडा (निवारागृहात) डांबून टाकावी व त्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा. यापुढे जर भटकी कुत्रे व जनावरे यांच्या हल्ल्यात नागरिकांचा जीव गेला तर अधिका-यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.

Tags: