◼️जिल्हाधिकारी अशोक काकडे
◼️ शहरात स्वच्छता मोहीम
◼️ मुख्याधिकाऱ्यांसह तासगावकर सहभागी
तासगाव / प्रतिनिधी
स्वच्छतेच्या बाबतीत तासगावकर संवेदनशील आहेत. स्वच्छतेची जबाबदारी केवळ नगरपरिषद किंवा सफाई कर्मचाऱ्यांची नसून ती आपलीही आहे अशी वृत्ती तासगावकरांमध्ये दिसून येते. याच वृत्तीच्या जोरावर तासगाव नगरपरिषद स्वच्छता मोहिमेत जिल्ह्यातील अन्य नगरपरिषदांच्या तुलनेत चांगले असल्याचे गौरोदगार जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी काढले. तासगाव शहरातील स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ श्री. काकडे यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी ते बोलत होते.
जिल्हाधिकाऱ्यांच्या संकल्पनेतून तासगाव शहरात तीन ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. शहरातील सर्व सामाजिक संघटना, आजी - माजी नगरसेवक, नागरिक, सर्व शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक, तसेच नगरपरिषद अधिकारी, कर्मचारी व पत्रकार यांनी स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. दत्तमाळ येथील सांगली रस्ता, मणेराजुरी रस्ता चौक येथील I LOVE TASGAON परिसर, एस टी स्टँड परिसर, जागृती शिक्षण संस्था संचालित तासगांव प्राथमिक विद्यामंदीर बेलभाग, तासगांव परिसर या ठिकाणी स्वच्छता मोहीम तसेच वृक्षारोपण करण्यात आले. सांगली रस्ता मणेराजुरी रस्ता चौक (पद्मभूषण डॉ. वसंतरावदादा पाटील महाविद्यालय चौक) येथील । LOVE TASGAON या ठिकाणी कृषी आयुक्त सुरज मांढरे, जिल्हाधिकारी अशोक काकडे यांचे सोबत विभागीय कृषी सह संचालक बसवराज मास्तोळी, प्रभारी जिल्हा सह आयुक्त तथा उपजिल्हाधिकारी शिवाजी जगताप, उपविभागीय अधीकारी तथा प्रांत उत्तम दिघे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार,तहसीलदार अतुल पाटोळे, उपविभागीय कृषी अधिकारी प्रकाश कुंभार, तालुका कृषी अधिकारी अनिल फोंडे उपस्थित होते.
तासगांव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सुधाकर लेंडवे यांनी उपस्थिचांचे स्वागत केले.
जिल्हाधिकारी काकडे यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करताना तासगावकरांचे शहर स्वच्छतेबाबतचे प्रयत्न कौतुकास्पद आहेत. स्वच्छता मोहिमेत नगरपरिषदेचे काम चांगले आहे. स्वच्छता मोहिमेत तासगाव नगरपरिषद जिल्ह्यात अग्रक्रमात येईल असे सांगत मोहिमेस शुभेच्छा दिल्या. आपण आपले घर जसे स्वच्छ ठेवतो तसेच आपला परीसर व पर्यायाने आपले शहर स्वच्छ कसे राहील याची जबाबदारी तासगाव नगरपरिषद कर्मचारी यांचे बरोबरीने शहरातील नागरिकांची आहे व ती स्वच्छतेची वृती तासगावकारांच्यात दिसून येते असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
स्वच्छता मोहिमेत सहभाग नोंदवलेल्या तासगाव नगरपरिषद तसेच शहरातील सर्व सामाजिक संस्था, असोसिएशन व उपस्थित सर्व नागरिकांचे मनापासून अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. राष्ट्रीय अवयवदान मोहिमेत सहभाग नोंदविलेल्या शहरातील विविध नागरिकांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. सारथी संस्थेच्या माध्यमातून प्रशिक्षण घेऊन ज्यांना नोकरी मिळाली त्यातील प्रातिनिधिक स्वरुपात चार मुलींना नियुक्ती पत्र देण्यात आले. तासगाव शहरातील रील्सस्टार रोहन धनवडे व सडेतोड ब्रॉडकास्ट चे सागर चव्हान यांचाही सन्मान करण्यात आला. रोटरी क्लब ऑफ तासगांव, रोटरॅक्ट क्लब ऑफ ग्रेप सिटी तासगाव, तासगांव तालुका इंजिनियर्स असोसिएशन,ड्रगीस्ट व केमिस्ट असोसिएशन, होमियोपॅथी डॉक्टर्स असोसिएशन, पद्मभूषण डॉ. वसंतरावदादा पाटील महाविद्यालय मधील शिक्षक तसेच NSS चे विद्यार्थी व विद्यार्थीनी, इतर सामाजिक संस्था यांचे अध्यक्ष तसेच उपस्थित सदस्य उपस्थित होते. प्रा.आबासाहेब बागल यांनी सूत्रसंचालन केले.
