◼️आमदार गोपीचंद पडळकर
◼️ सांगलीत ऋतुजा रोजगे आत्महत्या प्रकरणी मूक मोर्चा
सांगली / प्रतिनिधी
धर्मांतराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. धर्मांतराचे लोण आता खेड्यापाड्यातही पोहचले आहे. यापुढे धर्मांतराचे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. हिंदूंनो वेळीच शहाणे व्हा अन्यथा काळ माफ करणार नाही असे आवाहन आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले. दरम्यान राज्यात धर्मांतर विरोधी कायदा आणण्यास सरकारला भाग पाडू, असेही आमदार पडळकर यांनी यावेळी बोलताना सांगितले.
शहरातील यशवंतनगर येथील ऋतुजा सुकुमार राजगे या सात महिन्याच्या गरोदर महिलेने धर्मांतरासाठीच्या दबावाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली. अशा घटना यापुढे घडू नयेत, ऋतुजाच्या आत्महत्येप्रकरणी जबाबदार असणाऱ्या सर्वांना कडक शिक्षा देण्याच्या मागणीसाठी येथील स्टेशन चौकातून हिंदुत्ववादी संघटनांनी मूकमोर्चा काढला. मोर्चा राम मंदिर चौकात आल्यानंतर मोर्चाचे रुपांतर जाहीर सभेत झाले. या सभेत आ. पडळकर हे बोलत होते. आ. पडळकर म्हणाले, यापुढे जर कोणी धर्मांतर करण्यासाठी आले तर त्यांना ठोकून काढा. इथून पुढे जशास तसे उत्तर दिले जाईल.
बेकायदेशीर प्रार्थनास्थळांवर बुलडोझर चालवाआ. पडळकर म्हणाले, मूकमोर्चाच्या पार्श्वभूमीवर सांगलीत फलक लावले होते. ते फलक कायदा व सुव्यवस्थेचे कारण देऊन काढण्यात आले. बेकायदेशीर फलक काढल्याप्रकरणी आ. पडळकर यांनी आयुक्त, पोलीस अधीक्षकांचे अभिनंदन केले. ज्याप्रमाणे तुम्ही अनधिकृत फलक काढले, त्याचप्रमाणे जिल्ह्यातील बेकायदेशीर प्रार्थनास्थळांची यादी काढून त्याच्यावर बुलडोझर चालवावा, अशी मागणी आ. पडळकर यांनी केली.
यावेळी बोलताना माजी आमदार नितीन शिंदे म्हणाले, ऋतुजाच्या आत्महत्येप्रकरणी पास्टर, मध्यस्थाला अटक झाली पाहिजे. त्याला सहआरोपी करा. ऋतुजा आत्महत्याप्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवावा. याप्रकरणी विशेष सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती करावी अशी मागणी त्यांनी केली.
प्रारंभी स्टेशन चौकातून मूकमोर्चाला प्रारंभ झाला. मोर्चाच्या सुरुवातीला हातात मशाल घेऊन महिला सहभागी झाल्या होत्या. त्यानंतर हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
