◼️माजी राज्यमंत्र्यांसह दोन माजी आमदार
◼️युवा नेते, कार्यकर्ते घेतले पक्षात
सांगली / प्रतिनिधी
माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांच्यासह माजी आमदार विलासराव जगताप, माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांनी मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासोबत भाजप युवा मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष अनिल पाटील, जत विधानसभा मतदार संघातील भाजपाचे बंडखोर रवी तम्मणगौडा पाटील, माजी जिल्हापरिषद सदस्य रणधीर नाईक या युवा नेत्यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशाने जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे बळ वाढले आहे. अजितदादांचा हा मास्टरस्ट्रोक मानला जातो.
जिल्ह्याच्या राजकारणात याचे दूरगामी परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नाईक, देशमुख, जगताप यांचे राजकारण जवळपास संपल्यात जमा होते. त्यामुळे राष्ट्रवादी प्रवेशाने त्यांना नवसंजीवनी मिळण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर सांगली जिल्ह्यात अजितदादांना फारसा प्रतिसाद मिळाला नाही. माजी आमदार सदाशिव पाटील यांचे पुत्र वैभव पाटील वगळता एकही ग्रामीण भागात तगादा नेता अजितदादानकडे नव्हता. त्यात वैभव पाटील यांनीही ऐन विधानसभा निवडणूकित पक्ष बदलला. पण माजी खासदार संजयकाका पाटील, इस्लामपूरचे नगराध्यक्ष तथा भाजपाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील अजितदादा गोटात सहभागी झाले. पण पक्ष वाढ खुंटली होती.
माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांच्यासह माजी आमदार विलासराव जगताप, माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांच्या राष्ट्रवादीत प्रवेशाने पक्षाचे बळ वाढले आहे. जतचे रवी तम्मणगौडा, आटपाडीचे अनिल पाटील हे युवा नेतेही ताकतीचे आहेत. राष्ट्रवादीच्या वाढीत या नेत्यांचे कितपत योगदान मिळते हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईलच. परंतु कागदावर का असेना जिल्ह्यात आता अजितदादांची राष्ट्रवादी स्ट्राँग झाली आहे.
