yuva MAharashtra विटा आणि आष्टा येथील वर्ग २ च्या जमिनी वर्ग १ करण्याबाबत प्रस्ताव द्यावा

विटा आणि आष्टा येथील वर्ग २ च्या जमिनी वर्ग १ करण्याबाबत प्रस्ताव द्यावा

सांगली टाईम्स
By -


◼️महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे
◼️सांगली जिल्हाधिकारी यांना  आदेश 

मुंबई : प्रतिनिधी

विटा शहरातील यशवंतनगर आणि आष्टा येथील वर्ग २ च्या जमिनी वर्ग १ करण्याबाबतचा प्रस्ताव सांगली जिल्हाधिकारी यांनी पाठवावा. असे आदेश महसूलमंत्री चंद्रकांत बावनकुळे यांनी दिले.  महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दालनात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीवेळी ते बोलत होते. बैठकीला आमदार सुहास बाबर, भाजपा माजी जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले आदी उपस्थित होते. 

विटा शहरातील यशवंतनगर येथील सुमारे १२५ प्लॉट गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांना सुमारे ६५ वर्षांपूर्वी वाटप करण्यात आले होते या प्लॉट धारकांनी नियमाप्रमाणे सरकारी रक्कम भरलेली होती. सर्वांनी या ठिकाणी घरे बांधून वास्तव्य केलेले आहे. मात्र, अनावधानाने शर्तभंग झालेला आहे. या प्लॉट धारकांना शासनाकडून मोठ्या रकमा भरण्याच्या तसेच वसुलीच्या नोटीस देण्यात आल्या आहेत.  यामुळे प्लॉटधारक भयभीत झाले होते. त्यांना वर्ग दोन मधून भोगवटादार एक मध्ये परावर्तीत करण्याची विनंती केल्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत हा प्रस्ताव देण्यास सांगण्यात आले आहे. 

आष्टा तालुका वाळवा येथील जमिनी १९३१ मध्ये सरकारी जमिनी लिलावात खरेदी करण्यात आल्या होत्या. या ठिकाणी दीड हजाराहून अधिक मिळकत धारक असून गुंठेवारी विकास अधिनियम २००१ प्रमाणे प्लॉट नियमित केले आहेत. गेल्या ४० वर्षांपासून हे मिळकत धारक या ठिकाणी राहत असल्यामुळे जुन्या धोरणानुसार त्यांना रेडी रेकनर दर आकारण्यात यावा अशी मागणी करण्यात आली होती. या बाबत महसूलमंत्री बावनकुळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव पाठविण्याचे आदेश दिले आहेत. या प्रस्तावावर चर्चा करून निर्णय घेतला जाईल असेही महसूल मंत्र्यांनी सांगितले.

Tags: