◼️ संतोष पाटील यांचा आरोप
◼️ विधिमंडळात आमदार झोपा काढतात काय?
सांगली / प्रतिनिधी
कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूर येथे मंजूर करण्यात आले. वास्तविक हे उपकेंद्र सांगली येथे व्हावे अशी आग्रही मागणी विद्यार्थ्यांची होती. मात्र सांगलीच्या आमदारांच्या अनास्थेमुळे उपकेंद्र खानापूरला मंजूर झाल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते संतोष पाटील यांनी केला आहे. विधिमंडळात हा निर्णय होत असताना सांगलीचे आमदार झोपा काढत होते काय असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
पाटील म्हणाले, शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र सांगली शहरा लगतच मिरज,कुपवाड किंवा शहरापासून दहा पंधरा किलोमीटरच्या अंतरावर होणे अपेक्षित होते. परंतु हे उपकेंद्र साठ ते सत्तर किलोमीटरच्या अंतरावर म्हणजेच खानापूरला देण्याचे राज्य सरकारने जाहीर केले. त्यामुळे सांगलीतील इतर तालुक्यातील शैक्षणिक कामासाठी विद्यार्थ्यांना परत ९०ते १०० किलोमीटर अंतरावर त्या ठिकाणी जावे लागणार आहे.अनेक वेळा शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र सांगली मध्ये होण्यासाठी आम्ही शिष्ट मंडळ घेऊन विद्यापीठाचे कुलगुरू, राज्यपाल, मुख्यमंत्री, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तसेच जिल्ह्यातील आमदार, खासदार यांच्याकडे निवेदन दिले होते. उपकेंद्र हे सांगली शहरात लगदच व्हावे अशी मागणी होती. परंतु पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी खानापूर तालुक्यात करण्याचा निर्णय घेतला. जिल्ह्यातील अनेक भागातील व अनेक तालुक्यातील विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक, प्राध्यापक आणि पालकांना खानापूरला जाणे गैरसोयीचे आहे. त्या ठिकाणी राहण्याची, जेवणाची, वाहतुकीचा व सर्वात महत्त्वाचा म्हणजे विद्यार्थ्यांनी महिलां, युवती साठी हे ठिकाण भविष्यकाळात धोकादायक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
विद्यापीठ उपकेंद्र हे सांगली शहरात मंजूर झाले असते तर या ठिकाणी जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय कार्यालय असल्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांचे शैक्षणिक क्षेत्रातील कामे करण्यासाठी सोपे झाले असते. सांगलीच्या वैभवात भर पडली असती. सांगली शहर हे जिल्ह्याचे ठिकाण असल्यामुळे ते सर्वांना सोयीस्कर झाले असते असे सांगत पाटील म्हणाले, आमदार सुधीर दादा गाडगीळ हे निष्क्रिय आहेत. या आमदारांना सांगलीच्या विकासाबद्दल काही देणे घेणे नाही असे दिसते. सांगलीचे काय प्रश्न आहेत ते कसे मांडावे हे ही त्यांना कळत नाही. सांगलीचे आमदार विधिमंडळात प्रश्न कधीही मांडत नाहीत. कायम मौनी बाबाचे रूप धारण केल्यासारखे वागतात. प्रश्न मांडण्या ऐवजी त्या ठिकाणी झोपा काढतात की काय असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला. प्रा. नंदकुमार सुर्वे, एम के कोळेकर, खुदबुद्दीन मुजावर यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.
