◼️कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांची ससेहोलपट
◼️शासनाचे दुर्लक्ष
◼️अडीच कोटींची होईना तरतूद
सांगली / प्रतिनिधी
वैयक्तिक लाभाच्या अनेक योजनांमुळे राज्याचे आर्थिक गणित चांगलेच कोलमडले आहे. याची झळ आता शासकीय कर्मचाऱ्यांना विशेषतः कंत्राटी कर्मचाऱ्यांना बसू लागली आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानकडे कार्यरत असलेल्या जिल्ह्यातील ८०० हून अधिक कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचे पगार गेल्या दोन महिन्यांपासून प्रलंबित आहेत. जानेवारी, फेब्रुवारी आणि आता मार्च महिना संपत आला तरीही पगार न झाल्याने कर्मचाऱ्यांची आर्थिक अवस्था बिकट झाली आहे. घर खर्च, कर्जाचे हप्ते, संसाराचा गाडा कसा हाकायचा असा यक्ष प्रश्न कर्मचाऱ्यांच्या समोर निर्माण झाला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याची आर्थिक अवस्था भक्कम असल्याचे सांगत असले तरी वास्तवात परिस्थिती खूपच गंभीर आहे. लाडकी बहीणसह वैयक्तिक लाभाच्या अनेक योजनांनी राज्याच्या अर्थकारणाचे अक्षरशः कंबरडे मोडले आहे. छोट्या - मोठ्या घटकांवर याचे गंभीर परिणाम होत आहेत. राज्यातील ठेकेदारांची बिले थकली आहेत. त्यांच्यावर रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे. दुसरीकडे शासकीय धान्य गोदामामध्ये काम करणाऱ्या हमालांची हमाली गेल्या तीन ते चार महिन्यापासून प्रलंबित आहे. सरकारच्या अवकृपेने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
अडीच कोटींची तरतूद होईनाराष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांची संख्या ८०० हून अधिक आहे. या कर्मचाऱ्यांच्या पगाराची वर्षभर या ना त्या कारणाने बोंब असते. एकही महिन्यात वेळेवर पगार होत नाही. त्यात आता भरीस भर म्हणून गेल्या दोन महिन्यापासूनचा पगार थकला आहे. घर खर्च, कर्जाचे हप्ते, संसाराचा गाडा, मुलांचे शिक्षणाचा खर्च सावरताना या कर्मचाऱ्यांच्या नाकी नऊ आले आहे. महिन्याला अडीच कोटींची तरतूद शासनाला या कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी करावी लागते. तीही गेल्या दोन महिन्यापासून होत नसल्याने कर्मचाऱ्यांचे अर्थीक गणित कोलमडले आहे.
तर दुसरीकडे दुसऱ्यांच्या आरोग्यासाठी धडपडणाऱ्या कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचीही पगाराविना ससेहोलपट सुरू आहे. जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनआरएचएम) कडे कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची संख्या तब्बल ८००हून अधिक आहे. या कर्मचाऱ्यांना जानेवारीपासून वेतन मिळालेले नाही. जानेवारी, फेब्रुवारी आणि आता मार्च महिना संपत आला तरी वेतन झाले नसल्याने कर्मचाऱ्यांची आर्थिक अवस्था नाजूक झाली आहे. संसाराचा गाडा चालवायचा कसा असा प्रश्न या कर्मचाऱ्यांच्यासमोर उभा ठाकला आहे.
