◼️खून, खुनी हल्ल्यानी जिल्हा हादरला
◼️अवैध धंद्याचाही सुकाळ
◼️स्मार्ट पोलिसिंगची गरज
◼️लोकप्रतिनिधिची डोळेझाक
◼️मटका, अवैध व्यवसायात वाढ़
सांगली / प्रतिनिधी
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे. स्मार्ट पोलिसिंग कुठेच दिसून येत नाही. मटक्यासह अवैध धंद्याचा सुकाळ झाला आहे. चोरी, घरफोडीच्या घटना नित्याच्याच झाल्या आहेत, तर खून, खुनी हल्ल्यांची मालिकाच सुरु झाली आहे. कदमवाडी येथील सेंट्रिंग कामगाराचा खुनाची घटना ताजी असतानाच रविवरी सांगली मिरजेत दोन खुनाच्या घटना घडल्या तर इस्लामपूर येथे एकावर पाठलाग करून खुनी हल्ला करण्यात आला. या घटणांनी जिल्हा हादरला असून सांगली पोलिसांच्या इभ्रतीचे पुरते धिंधवडे निघाले आहेत. कायदा व सुव्यवस्था राखण्यात पोलीस सपशेल नापास झाले आहेत.
लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष, पोलिसांचे ढिसाळ पोलिसिंग यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा पुरता बट्ट्याबोळ उडाला आहे. 'पोलीस' नावाचा धाकच उरला नाही काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. अवैध व्यवसायिकांनी पुन्हा डोके वर काढले आहे. मटका खुलेआम सुरु आहे. कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. कागदोपत्री केवळ कारवाईचे फार्स केला जातो. गांजा, नशेच्या गोळ्या याला पूर्णपणे आळा घालण्यात पोलिसांना अपयश आले आहे. गंभीर गुन्ह्यात अल्पवयीन मुलांचा सहभाग वाढला आहे. याला गांजासह नशा हेच प्रमुख कारण आहे.
रविवार खुनाचा 'वार'◼️ दुपारी २ वाजता इस्लामपुरात खुनी हल्ला◼️ सायंकाळी ८ वाजता सांगलीतील प्रियांका चव्हाण या महिलेचा खून◼️ रात्री ९:३० वाजता मिरजेत विविध गुन्ह्यात सहभागी असलेल्या युवकाचा खून..
दुसरीकडे चोरी, घरफोडीच्या घटना नित्याच्याच झाल्या आहेत. हजारो, लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरीला जातं आहे. यामुळे पोलिसांच्या पोलिसिंगवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. खून, खुनी हल्ल्यांच्या घटनामध्ये मोठया प्रमाणात वाढ झाली आहे. रविवार तर खुनाच्या घटनांनी गाजला. सांगलीत एका तरुणीचा खून झाला. तर मिरजेत विविध गुन्ह्यात सहभागी असलेल्या एका युवकाची हत्या करण्यात आली. इस्लामपूरमध्ये एकावर पाठलाग करून खुनी हल्ला करण्यात आला. एकाच दिवशी झालेल्या या गंभीर घटनांनी जिल्हा हादरून गेला आहे. नागरिकांच्या मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्यात कायद्याचा धाक निर्माण करण्यात पोलीस 'नापास' झाल्याची भावना नागरिकांची झाली आहे.
