yuva MAharashtra सांगलीत रविवारी महिलांसाठी 'चंद्र नमस्कार' योग कार्यक्रम

सांगलीत रविवारी महिलांसाठी 'चंद्र नमस्कार' योग कार्यक्रम

सांगली टाईम्स
By -


एशिया आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद होणार; तरुण भारत व्यायाम मंडळ आणि अॅबसुल्युट फिटनेस सेंटरचा उपक्रम

सांगली : प्रतिनिधी

येथील तरुण भारत व्यायाम मंडळ आणि अॅबसुल्युट फिटनेस सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांचा 'चंद्र नमस्कार' हा योग कार्यक्रम रविवार, दि. ९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता तरुण भारत व्यायाम मंडळाच्या भव्य स्टेडियमवर आयोजित केला आहे. या उपक्रमाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये होणार आहे, अशी माहिती तरुण भारत व्यायाम मंडळाचे अध्यक्ष महेश पाटील आणि अॅबसुल्युट फिटनेस सेंटरच्या संचालक अर्चना कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ते म्हणाले, तरुण भारत व्यायाम मंडळाने कबड्डी, शरीरसौष्ठव, कुस्ती, रिंगटेनिस, स्केटींग, योगासन यासह अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे यशस्वी संयोजन केले आहे. अनेक क्रीडा प्रकारासाठी या संस्थेचे मोठे योगदान लाभले आहे. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू या संस्थेने देशाला दिलेले आहेत. १९३० ला स्थापन झालेल्या या संस्थेला आता ९५ वर्षे पूर्ण झाली आहेत. ही संस्था शताब्दी महोत्सवाकडे वाटचाल करत आहे. याचाच एक भाग म्हणून चंद्र नमस्कार योग कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. जगातला हा पहिला उपक्रम आहे.

ADVT.

चंद्र नमस्कार हा प्राचीन हिंदू संस्कृतीतील एक सुंदर योग प्रकार आहे. त्याचा प्रसार आणि प्रचार होण्याच्या दृष्टिकोनातून महिलांच्या सामुहिक चंद्र नमस्कार उपक्रमाचे आयोजन केले आहे. यामध्ये १२०० महिलांसह हजारो नागरिक सहभागी होतील. सूर्यनमस्काराइतकाच चंद्र नमस्कारही महत्वाचा योगप्रकार आहे. महिलांसाठी तर तो अत्यंत आवश्यक आहे. शरीराची लवचिकता आणि व्यक्तिमत्व सुधारण्यासाठी त्याचा खूप उपयोग होतो. शिवाय तो मेंदू तल्लख ठेवतो. या योग प्रकाराचे अनेक फायदे आहेत. दरवर्षी कोजागिरी पौर्णिमेदिवशी चंद्र नमस्कारचा मोठ्या प्रमाणात उपक्रम व्हावा अशी अपेक्षा आहे. त्याची सुरुवात आम्ही सांगलीतून करत आहोत तसेच शाळांनीसुद्धा आठवड्यातील एक दोन तास हा योग प्रकार चालू ठेवावा यासाठी आमचे प्रयत्न आहेत.

या उपक्रमाची तरुण भारत स्टेडियमवर जय्यत तयारी करण्यात आली आहे. या कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे. इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्डचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद होण्यासाठी जे काही नियम आहेत त्याची सर्व ती तयारी झाली आहे. सायंकाळच्या शांत वातावरणात आणि चंद्राच्या शीतल प्रकाशात तसेच उत्तम संगीताच्या तालावर होणाऱ्या या उपक्रमाला हजारोंच्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन त्यांनी केले आहे.

Tags: