yuva MAharashtra 'वसंतदादा, महांकाली' त निवडणुकीची रणधुमाळी

'वसंतदादा, महांकाली' त निवडणुकीची रणधुमाळी

सांगली टाईम्स
By -


वसंतदादासाठी ९ मार्चला तर महांकालीसाठी २३ फेब्रुवारीला मतदान

सांगली / प्रतिनिधी

सांगलीतील वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना आणि कवठेमहांकाळ येथील महांकाली साखर कारखान्याच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. 'वसंतदादा'साठी मतदान ९ मार्च तर मतमोजणी १० मार्चला,  महांकाली कारखान्यासाठी २३ फेब्रुवारीला मतदान होणार आहे.  तर २५ रोजी मतमोजणी होणार आहे.  

वसंतदादा कारखान्याच्या २१ संचालक पदांसाठी निवडणूक होणार असून ५३ इच्छुकांनी अर्ज खरेदी केले आहेत. त्यातील तिघांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. वसंतदादा कारखान्याच्या सांगली, मिरज, आष्टा, भिलवडी, तासगाव या पाच गटांमधून प्रत्येकी ३ असे एकूण १५, उत्पादक सहकारी संस्था, बिगर उत्पादक सहकारी संस्था व पणन संस्था सभासद मतदारसंघ क्रमांक २ आणि अनुसूचित जाती किंवा जमाती मागासवर्गीय १, भटक्या-विमुक्त जाती व जमाती, विशेष मागास प्रवर्गमधून १ असे २१ संचालक निवडून द्यायचे आहेत.

ADVT.

उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली असून अंतिम मुदत ७ फेब्रुवारी आहे. अर्जांची छाननी १० फेब्रुवारीला करण्यात येणार असून अवैध अर्जाची प्रसिद्धी ११ फेब्रुवारी केली जाणार आहे. तर ११ ते २५ फेब्रुवारी या काळात अर्ज मागे घेण्याची मुदत असून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी २७ फेब्रुवारीस प्रसिद्ध केली जाणार आहे. आवश्यकता वाटल्यास ९ मार्चला सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान घेतले जाईल. १० मार्चला सकाळी ८ पासून मतमोजणी सुरू होणार असून लगेच निकाल घोषित होणार आहे.

दरम्यान कवठेमहांकाळ महांकाली साखर कारखान्यासाठी नामनिर्देशन पत्र विक्री व स्वीकृती ७ फेब्रुवारी ते ११ फेब्रुवारी, नामनिर्देशन यादी प्रसिद्ध ११ फेब्रुवारी, अर्ज छाननी १४ फेब्रुवारी आणि अर्ज माघार १७ फेब्रुवारीपर्यंत घेता येणार आहे. तर अंतिम यादी देखील याच दिवशी प्रसिद्ध केली जाईल. मतदान २३ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ ते ४ या वेळेत होईल, तर २५ रोजी मतमोजणी होणार आहे. वसंतदादा कारखान्याचे कार्यक्षेत्र विस्तारित असून येथे पाच गट आहेत. ज्यात सांगली, मिरज, आष्टा, भिलवडी, तासगावचा परिसर येतो. येथे अंतिम मतदार यादितील ३६ हजारांवर मतदार आहेत.  


Tags: