yuva MAharashtra 'तासगाव - कवठेमहांकाळ'मध्ये भाजप किसान मोर्चाचे काम कौतुकास्पद

'तासगाव - कवठेमहांकाळ'मध्ये भाजप किसान मोर्चाचे काम कौतुकास्पद

सांगली टाईम्स
By -
तासगाव - कवठेमहांकाळ मतदार संघात सदस्य नोंदणी टार्गेट पूर्ण केल्याबद्दल संदीप गिड्डे-पाटील यांचा सत्कार करताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील. बाजूस जिल्हाध्यक्ष दीपकबाबा शिंदे, माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, माजी आमदार दिनकरतात्या पाटील.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील : मतदारसंघात ६५ हजार सदस्यांची नोंदणी

तासगाव : प्रतिनिधी

तासगाव - कवठेमहांकाळ मतदारसंघासाठी ६० हजार ७०० सदस्यांच्या नोंदणीचे टार्गेट भाजपने दिले होते. मात्र आतापर्यंत सुमारे ६५ हजार सदस्यांची नोंदणी पूर्ण करण्यात आली आहे. भाजप किसान मोर्चाचे महामंत्री संदीप गिड्डे - पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी तळागाळापर्यंत जाऊन हे सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट पूर्ण केले. भाजप किसान मोर्चाचे पक्ष बांधणीचे हे काम कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी काढले.

सांगली (विश्रामबाग) येथील आमदार सुधीर गाडगीळ यांच्या संपर्क कार्यालयात १०० पेक्षा जास्त सदस्य नोंदणी करणाऱ्या सुमारे ३५० कार्यकर्त्यांचा पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. पाटील म्हणाले, तासगाव - कवठेमहांकाळ मतदार संघातून काही जण पक्ष सोडून गेले. मात्र कोणी कुठेही गेले तरी भाजपच्या लोकप्रियतेमध्ये कसलाही फरक पडलेला नाही. राज्यात आणि देशात भाजप महायुतीचे सरकार आहे. त्यामुळे राज्यभरातून भाजपकडे आकर्षित होणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

ते म्हणाले, गेल्या दोन महिन्यांपासून राज्यभरात भाजपची सदस्य नोंदणी सुरू आहे. तासगाव कवठेमहांकाळ मतदार संघासाठी 60 हजार 700 सदस्यांची नोंदणी करण्याचे 'टार्गेट' दिले होते. नोंदणीची प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वीच सुमारे 65 हजार सदस्यांची नोंदणी करण्यात आली आहे. 27 मतदारसंघांमध्ये तासगाव - कवठेमहांकाळ हा मतदारसंघ सदस्य नोंदणीच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. ते म्हणाले, या मतदारसंघात भाजप किसान मोर्चाचे महामंत्री संदीप गिड्डे - पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणावर सदस्य नोंदणी करण्यात आली. गावागावात यात्रा - जत्राच्या माध्यमातूनही सदस्य नोंदणी करण्यात आली. भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी रात्रीचा दिवस करून सदस्य नोंदणी पूर्ण केली. उन्हातान्हात, गावागावात फिरून दिलेले लक्ष पूर्ण करण्यासाठी घाम गाळला. कार्यकर्त्यांनी सदस्य नोंदणीसाठी केलेले प्रयत्न खरोखरच कौतुकास्पद आहेत.

'तासगाव - कवठेमहांकाळ'मधील कार्यकर्त्यांना योग्य न्याय देऊ 

तासगाव - कवठेमहांकाळ मतदारसंघात अनेक अडचणी असताना भाजप किसान मोर्चाचे महामंत्री संदीप गिड्डे -  पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुमारे ६५ हजार सदस्यांची नोंदणी पूर्ण करण्यात आली आहे. ६५ हजार सदस्यांनी भाजपवर टाकलेला विश्वास कधीही वाया जाणार नाही. पालकमंत्री म्हणून सर्व कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक दिली जाईल. शिवाय कार्यकर्त्यांना आगामी काळात योग्य तो न्याय दिला जाईल, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यावेळी स्पष्ट केले.

दरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही तासगाव - कवठेमहांकाळमधील सदस्य नोंदणीबाबत यापूर्वीच गौरवोद्गार काढले आहेत. तर भाजपचे प्रदेश कार्याध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनीही गिड्डे - पाटील यांचे कौतुक केले आहे. तासगाव - कवठेमहांकाळ मतदारसंघात संदीप गिड्डे - पाटील यांच्या माध्यमातून एक तरुण तडफदार, शेतकरी नेता भाजपाला मिळाल्याची चर्चा आहे. गिड्डे - पाटील यांच्या नेतृत्वाखालीच ही सदस्य नोंदणी पूर्ण करण्यात आली आहे. पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते आज सांगली विश्रामबाग येथील आमदार सुधीर गाडगीळ यांच्या संपर्क कार्यालयात १०० पेक्षा अधिक सदस्य नोंदणी करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकण्यात आली. यावेळी मकरंद देशपांडे, दीपक शिंदे, आमदार गोपीचंद पडळकर, भाजप किसान मोर्चाचे महामंत्री संदीप गिड्डे पाटील, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, दिनकर पाटील, महेश पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत तासगाव - कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष स्वप्निल पाटील यांनी केले. प्रास्ताविक मिलिंद कोरे यांनी, सूत्रसंचालन गोविंद सूर्यवंशी यांनी केले. आभार अनिल लोंढे यांनी मानले.




Tags: