yuva MAharashtra साहित्यिकांनी वास्तवाचे भान ठेवून लिहावे

साहित्यिकांनी वास्तवाचे भान ठेवून लिहावे

सांगली टाईम्स
By -

नवव्या प्रतिष्ठा साहित्य संमेलनात अध्यक्षपदावरून बोलताना कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे, मंचकावर उद्घाटक डॉ. रणधीर शिंदे, स्वागताध्यक्ष प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे, प्रदीप माने- पाटील, ॲड, कृष्णा पाटील, प्राचार्य व्ही. एच. पाटील, ज्येष्ठ साहित्यिक शिवाजीराव देशमुख, उद्योजक प्रशांत पाटील, प्रा. जी. के पाटील, तानाजीराजे जाधव.

प्रा. डॉ. माणिकराव साळुंखे; तासगाव येथे नववे प्रतिष्ठा साहित्य संमेलन उत्साहात; राज्यभरातील साहित्यिकांचा सहभाग

तासगाव / प्रतिनिधी : 

साहित्यिक क्रांती करू शकतात त्यामुळे त्यांनी स्वप्न रंजनापेक्षा वास्तवाचे भान ठेवत वैचारिक समाज निर्मितीसाठी लिहिले पाहिजे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. डॉ. माणिकराव साळुंखे यांनी केले. तासगाव येथे प्रतिष्ठान फाउंडेशन आयोजित ९ व्या प्रतिष्ठा राज्यस्तरीय साहित्य संमेलनात ते संमेलन अध्यक्ष म्हणून बोलत होते. 

संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ समीक्षक प्रा. डॉ.  रणधीर शिंदे यांच्या हस्ते झाले. ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. बाबुराव गुरव यांचा ७५ व्या निमित्त प्रतिष्ठा फाउंडेशन च्या वतीने कुलगुरू डॉ . माणिकराव साळुंखे यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. प्रतिष्ठा पुरस्कार प्रदान सोहळाही यावेळी पार पडला. प्रास्ताविक प्रतिष्ठा फौंडेशनचे अध्यक्ष संमेलनाचे निमंत्रक तानाजीराजे यांनी केले. स्वागताध्यक्ष प्राचार्य मिलिंद हुजरे यांनी संमेलनाची परंपरा व उद्देश मांडले. पहिल्या सत्राचे आभार सरपंच परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रदीप माने- पाटील यांनी मानले. ॲड. कृष्णा पाटील, प्राचार्य व्ही. एच. पाटील, ज्येष्ठ साहित्यिक शिवाजीराव देशमुख, उद्योजक प्रशांत पाटील, प्रा. जी. के पाटील यांच्यसह राज्यभरातून साहित्यिक उपस्थित होते.  प्रा. किशोर पाटील, सौ. विद्या जाधव, प्रतिष्ठा जाधव, संजय माळी, विनायक कदम, प्राचार्य व्ही. एम. पाटील, पूर्णांक जाधव, प्रदीप पोतदार यांनी संयोजन केले. 

दुसऱ्या सत्रात  गझलकार मनीषा रायजादे यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन झाले. डॉ. स्वाती पाटील यांनी सुत्रसंचलन केले. यामध्ये राज्यभरातील ५० हून अधिक कवींनी सहभाग घेतला. आभार प्रा. जी. के. पाटील यांनी मानले.  डॉ. माणिकराव साळुंखे म्हणाले, तासगाव ही मायभूमी असल्याने येथे येण्याची आपुलकीची ओढ होती. या भागात आपण प्रतिष्ठा साहित्य संमेलनाच्या माध्यमातून साहित्य चळवळ जोपासत आहात  हि कौतुकाची बाब आहे. गावोगावी होणारी संमेलने ही साहित्य समृद्ध करणारी आहेत. 

ADVT.

पूर्वी फक्त नदीकाठी समृद्धी असायची पण आता दुष्काळी भागाकडे शिवाय समृद्धी दिसू लागली आहे. आता भौतिक संपत्ती बरोबर वैचारिक संपत्ती सुद्धा निर्माण करण्याची आवश्यकता भासू लागली आहे. चार्वाका पासून आज पर्यंत अनेक संत व साहित्यिकांनी क्रांती आहे. आता कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे (एआय) सगळे जग बदलले आहे. ज्ञानाची प्रचंड निर्मिती आणि माहितीचा प्रचंड स्फोट होत असताना साहित्याचा दर्जा राखण्याची जबादारी साहित्यिकांची आहे. शास्त्र , धर्म आणि विज्ञानाने केवळ मानवी विकासाबरोबर संस्कृती टिकवण्यासाठी समन्वय साधला पाहिजे. 

माणिकराव साळुंखे पुढे म्हणाले, प्रयोगशाळेत मुले जन्माला येऊ लागली तर संस्कृतीचं काय होईल हा प्रश्न निर्माण होणार आहे. त्याच बरोबर आता एआय च्या माध्यमातून तुम्ही फक्त कल्पना सांगून कादंबरी लिहू शकता. अशाप्रकारे निर्माण झालेल्या साहित्याचे अभिव्यक्ती मालक कोण असणार. साहित्यिक क्रांती करू शकतात त्यामुळे त्यांनी स्वप्न रंजनापेक्षा वास्तवाचे भान ठेवत वैचारिक समाज निर्मितीसाठी लिहिले पाहिजे. असे आवाहन डॉ. माणिकराव साळुंखे यांनी केले. उद्धघाटक प्रा. रणधीर शिंदे म्हणाले,  सामाजिक समस्यांना  मांडणारे साहित्यच सर्व सामान्य माणसाला न्याय देऊ शकते. ग्रामीण साहित्य संमेलने हि साहित्यिकांना बळ देणारी पाहणी लिहिते करणारी असतात त्यामुळे अशी संमेलने झाली पाहिजेत. परंतु त्याचा केवळ उत्सव न होता समाज प्रबोधन झाले पाहिजे.




Tags: