yuva MAharashtra सांगलीच्या विकासासाठी वाढीव निधी देणार

सांगलीच्या विकासासाठी वाढीव निधी देणार

सांगली टाईम्स
By -

उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांची ग्वाही

पुणे / प्रतिनिधी

सांगली महत्त्वाचा जिल्हा आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी वाढीव निधी देण्याचा प्रयत्न करू. या निधीचा विनियोग योग्य पद्धतीने करावा, असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी आज दिले. जिल्हा वार्षिक योजनेसाठी निधीची जरी मर्यादा घालून दिली असली तरी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आधीच जिल्ह्याच्या विकासासाठी अधिक निधीची मागणी केली आहे. वाढीव निधी देण्यात येईल, असे श्री. पवार यांनी सांगितले. 

चालू आर्थिक वर्षात दिलेला निधी विहित वेळेत खर्च करावा, असे सांगून उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार म्हणाले, माझी शाळा, आदर्श शाळा उपक्रमासाठी शासनाकडून निधी देऊ. केंद्र शासनाच्या योजनांचा अधिकाधिक निधी जिल्ह्यात येईल, यासाठी प्रशासनाने नियोजन करावे. 

शासकीय इमारती व महापालिका क्षेत्रातील पथदिवे व पाणीयोजनांची विजेची गरज सौरउर्जेतून भागवण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच, सौरउर्जेसाठी गायरान जमीन देताना मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करावे. मोठे क्षेत्र सौरउर्जेसाठी देण्यासाठी प्रथम प्राधान्य द्यावे, अशा सूचना श्री. पवार यांनी यावेळी दिल्या.

Tags: