करजगी येथील घटना; संशयितास अटक; जत बंदची हाक
जत / प्रतिनिधी
करजगी (ता. जत) येथे माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. एका चार वर्षीय बालिकेचा एका ४५ वर्षाच्या व्यक्तीने खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. खूनानंतर त्याने बालिकेचा मृतदेह पोत्यात घालून लोखंडी पेटीत लपवला होता. याप्रकरणी संशयित पांडुरंग सोमनिंग कळ्ळी (वय ४५, रा. करजगी) याला उमदी पोलिसांनी तत्काळ अटक केली आहे. या घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण असून पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, करजगी येथे चार वर्षांची चिमुरडी मुलगी आजी- आजोबा सोबत राहते. तिचे आई-वडील मोलमजुरी करण्यासाठी रत्नागिरी येथे कामानिमित्त राहतात. नराधम संशयित पांडुरंग कळ्ळी पीडित मृत बालिकेच्या घराजवळच राहतो. दरम्यान, नात बराच वेळ कुठे दिसत नाही म्हणून आजीने तिचा शोध सुरू केला. चौकशी करताना शेजारील पांडुरंग याने तिला घेऊन गेल्याचे शेजाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे आजी त्याच्या घराकडे गेली. तेव्हा पांडुरंग पत्र्याच्या शेडसमोर झोपल्याचे निदर्शनास आले.
आज जत बंदची हाक
संशयित पांडुरंग कळ्ळी याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. दरम्यान बालिकेच्या खुनानंतर सर्वत्र संतप्त पडसाद उमटत आहेत. करजगी ग्रामस्थांनी शुक्रवारी जत तालुका बंदची हाक दिली आहे. त्यामुळे जत शहरासह करजगी गावात बंदोबस्त ठेवला आहे.
त्याला नातीबद्दल विचारणा केली असता माहिती नसल्याचे सांगितले. तसेच त्याने लोकांबरोबर बालिकेला शोधण्यासाठी मदत करण्याचा बहाणा केला. दरम्यान काही लोकांनी उमदी पोलिस ठाण्यात चार वर्षीय बालिका बेपत्ता झाल्याचे फोन करून सांगितले होते. उमदी पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक संदीप कांबळे यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. बालिकेचा शोध घेत असताना पांडुरंग याच्याबरोबर तिला पाहिल्याचे काहींनी सांगितले. शोधाशोध करताना लोखंडी पेटीमध्ये बालिकेचा मृतदेह पोत्यात घालून टाकल्याचे निदर्शनास आले. पांडुरंग याला तत्काळ ताब्यात घेऊन उमदी पोलिस ठाण्यात आणले.
![]() |
| ADVT. |
बालिकेच्या खुनाची माहिती मिळताच परिसरात गर्दी जमली. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जत येथे पाठविण्यात आला आहे. दरम्यान घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण पाहून तातडीने पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. पोलिस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलिस अधीक्षक रितू खोकर, स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. तसेच उमदी पोलिसांना तपासाबाबत सूचना केल्या. नागरिकांना शांततेचे आवाहन केले.

