![]() |
| श्री गणेशानंद महाराज |
सांगली / प्रतिनिधी
शिवशक्ती सिध्दपिठ सहयाद्री पहाड ट्रस्टच्या वतीने रिंगेवाडी (ता. शाहूवाडी) येथील मुक्तानंद तिर्थस्थळ आश्रमामध्ये रविवार २३ फेबु्रवारी ते गुरुवार २७ फेबु्रवारी अखेर महाशिवरात्री उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये पहाटे विनापूजन, पारायण,, गुरुगीता वाचन, ध्यान, महाप्रसाद आदी कार्यक्रमांचा समावेश आहे. या काळात या ठिकाणी मोठी यात्राही भरते. भाविकांनी या सोहळयास मोठया संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.
मूळचे कर्नाळ (ता. मिरज) येथील श्री गणेशानंद महाराज लहान वयापासूनच ध्यान धारणा, गरीब, पिडीतांची संकटे निवारण करण्याचे काम करीत होते. गणेशपुरी येथील नित्यानंद महाराज यांचे त्यांनी शिष्यत्व पत्करले. गुरुंची सेवा केली. गुरुंच्या आदेशाने त्यांनी दुर्गम भागात स्थान निर्माण केले. वयाच्या ८० व्या वर्षी १ नोव्हेंबर २०२० रोजी त्यांनी रिंगेवाडी येथील जंगलामध्ये मुक्तानंद तिर्थस्थळी जिवंत समाधी घेतली. गणेशानंद महाराज या ठिकाणी दरवर्षी शिवरात्र उत्सव साजरा करत. त्यांची ही परंपरा आजही कायम आहे.
रविवार २३ फेबु्रवारी ते गुरुवार २७ फेबु्रवारी अखेर मुक्तानंद तिर्थस्थळी महाशिवरात्री उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. रविावार २३ रोजी सकाळी ७ वाजता विणा पूजन व गुरुपादुका पूजन तसेच नामस्मरण धून, दररोज गुरुगीता वाचन, नाम संकिर्तन आणि आरती, महाप्रसाद आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाचा हा ४३ वा उत्सव आहे. महाराष्ट्रासह अन्य राज्यातून मोठया संख्येने भाविक, भक्तगण या सोहळयास उपस्थित राहणार आहेत, असे ट्रस्टच्या वतीने सांगण्यात आले.
