yuva MAharashtra राज्यातील २ कोटी महिलांची होणार आरोग्य तपासणी

राज्यातील २ कोटी महिलांची होणार आरोग्य तपासणी

सांगली टाईम्स
By -

 

ठाणे येथे 'समृद्ध महाराष्ट्र, संपन्न महाराष्ट्र' अभियानाचा शुभारंभ आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे यांच्या शुभ हस्ते करण्यात आला. यावेळी सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबीटकर व अन्य.


'समृध्द महाराष्ट्र, संपन्न महाराष्ट्र' अभियानाचा शुभारंभ

मुंबई / प्रतिनिधी

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने ठाणे येथे 'समृद्ध महाराष्ट्र, संपन्न महाराष्ट्र' अभियानाचा शुभारंभ आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांच्या शुभ हस्ते करण्यात आला.  सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने आरोग्य सुविधांचा लोकार्पण सोहळा पार पडला. आरोग्य विभागाच्या माध्यमातून राज्यातील २ कोटी महिलांची आरोग्य तपासणीचे महाअभियान राबविण्यात येणार आहे. 

राज्य शासन निरोगी महाराष्ट्र बनविण्यासाठी कटिबद्ध असून, रुग्णांना वेळेवर तातडीने उपचार मिळणे आवश्यक आहे. सामाजिक, कौटुंबिक आणि व्यावसायिक जबाबदारी सांभाळत असताना माता-भगिनी कायमच आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे 'निरोगी महाराष्ट्र' बनविण्यासाठी सर्वप्रथम राज्यातील माता-भगिनींचे आरोग्य जपणे अतिशय महत्त्वाचे असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी सांगितले.  

महिलांवर विविध जबाबदाऱ्या असल्यामुळे त्यांचे स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी त्यांना वेळ मिळत नाही. ही गोष्ट लक्षात घेऊनच आरोग्य विभागाने राज्यातील महिलांचे आरोग्य तपासणी करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.  या लोकार्पण सोहळ्यामध्ये आरोग्य विभागामार्फत आरोग्य सेवा अधिक सक्षम, दर्जेदार आणि नागरिकांना सहजपणे उपलब्ध करून देण्यासाठी ८ कर्करोग मोबाईल व्हॅन, ७ अॅडव्हान्स लाईफ सपोर्ट रुग्णवाहिका, १०२ क्रमांकांच्या ३८४ रुग्णवाहिका, २ सीटी स्कॅन मशीन, ८० डिजिटल हँड हेल्ड एक्स-रे मशीनचे लोकार्पण करण्यात आले. 

त्याचप्रमाणे राज्यात ६ डे केअर किमोथेरपी सेंटर सुरू करण्याची घोषणा यावेळी करण्यात आली. राज्यातील दोन कोटी महिलांची आरोग्य तपासणी उपक्रमांतर्गत रक्त तपासणी - हिमोग्लोबिन सर्व प्रकारच्या तपासण्या, मधुमेह, रक्तदाब, गरजेनुसार ईसीजी तपासणी, सर्वसाधारण तपासणी, निदान व उपचार करण्यात येणार आहेत. यावेळी आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या डॉक्टर्स, दंतशल्यचिकित्सक, अधिपरिचारिका तसेच आरोग्य सेविकांचा यावेळी सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. 
या समारंभास आयुष मंत्रालय आणि आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाचे केंद्रीय राज्यमंत्री नाम.प्रतापरावजी जाधव साहेब, विधान परिषदेच्या उपसभापती श्रीमती निलमताई गोऱ्हे,  राज्याचे परिवहन मंत्री नाम.प्रतापजी सरनाईक, राज्यमंत्री आशिष जयस्वाल, अभिनेता गोविंदा, नविन सोना, आरोग्य सेवा तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक अमगोथू श्री रंगा नायक तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.