शिवसेना शिंदे गटात नवा 'उदय'; २० आमदार सोबती; खासदार संजय राऊत यांचा दावा
मुंबई / प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शिवसेनेतील (शिंदे गट) मंत्री उदय सामंत २० आमदारांसह वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याचा खळबळजनक दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. यामुळेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज होवून पुन्हा 'दरे' या गावी गेल्याचा आरोपही त्यांनी यावेळी बोलताना केला. दरम्यान याला अनुसरून राज्याचे माजी विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनीही शिंदे गटात नवा उदय होणार असल्याचे सांगत आणखीनच खळबळ उडवून दिली आहे.
महायुतीचे सरकार आल्यापासून सातत्याने रुसवे - फुगवे सुरू आहेत. सरकार स्थापनेपूर्वी अनेक राजकीय घटना घडल्या. शपथविधीच्या काही काळ आधी पर्यंत ड्रामा सुर होता. मंत्रिमंडळ विस्तारात ही हेच पाहायला मिळाले. आता पालकमंत्री पद वाटप झाल्यानंतर पुन्हा नाराजी उफळली आहे. यातून रायगड मध्ये जाळपोळ झाली. आदिती तटकरेंच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्याची नामुष्की सरकारवर आली.
दरम्यान महायुतीमध्ये आता फक्त मारामारी होणे बाकी असल्याचे सांगत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले, शिंदे गटात सरकार स्थापन होण्यापूर्वीच फूट पडणार होती. पण शिंदे वेळीच सावध झाले. मंत्री उदय सामंत यांच्याबरोबर किमान २० आमदार आहेत. दरम्यान राऊत यांच्या या दाव्याला अनुसरून काँग्रेसचे आमदार तथा माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही शिंदे गटात नवा ' उदय ' असे म्हणत खळबळ उडवून दिली आहे. त्यामुळे आगामी काळात शिंदे गटात फूट पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
