![]() |
| (प्रतीकात्मक फोटो) |
विटा / प्रतिनिधी
विटा येथील साळशिंगे रस्त्यावर असणाऱ्या शासकीय निवासी शाळेतील २३ विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. उलटी, जुलाब, पोटदुखीचा त्रास सुरू झाल्यानंतर विद्यार्थांना तातडीने उपचारासाठी विटा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच आमदार सुहास बाबर यांनी तातडीने रुग्णालयात भेट देत विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यांच्यावर आवश्यक ते उपचार करण्याच्या सूचना वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. दरम्यान विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.
विटा येथे साळशिंगे रस्त्यावर शासकीय निवासी शाळा आहे. यामध्ये ९३ विद्यार्थी शिक्षण घेतात. रविवारी विद्यार्थ्यांना दुपारी मटण, सायंकाळी दूध आणि कलिंगड तर रात्री चपाती, आमटीचे जेवण देण्यात आले. त्यानंतर रात्री काही विद्यार्थ्यांना उलटी, जुलाबचा त्रास सुरू झाला. काहींच्या पोटात दुखत होते. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत शाळा व्यवस्थापनाने त्रास सुरू झालेल्या विद्यार्थांना तातडीने विटा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. त्यांच्यावर आवश्यक ते उपचार सुरू आहेत. दरम्यान या प्रकारामुळे विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

