yuva MAharashtra धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी सरकारवर दबाव

धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी सरकारवर दबाव

सांगली टाईम्स
By -

फडणवीस, पवारांच्या भूमिकेकडे लक्ष; राज्यातील वातावरण तप्त

सांगली / प्रतिनिधी

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणाचे पडसाद आता राज्यभरात उमटू लागले आहेत. बीड, परभणी नंतर पुण्यातही या प्रकरणी जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. वाल्मिकी कराड नंतर या प्रकरणात राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या नावाने मोठा आक्रोश सुरू आहे. त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्याची मागणी होत आहे. सरकार वर यामुळे प्रचंड दबाव आला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे काय भूमिका घेतात याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
    सरपंच देशमुख हत्या प्रकरण चांगलेच तापले आहे. देशमुख यांची हत्या ज्या पद्धतीने झाली ती पाहता, एकता राज्यात संतापाची लाट उसळली आहे. याच बरोबर कायदा व सुव्यवस्थावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. देशमुख कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे यासाठी जनभावना तीव्र होत आहे. या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांना सत्ताधर्र्यसह विरोधी पक्षाच्या आमदारांनी चांगलेच घेरले आहे. आका अर्थात वाल्मिकी कराड चे आका धनंजय मुंडे असल्याचा आरोप होत आहे. मुंडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी होत आहे. बीड, परभणी आणि रविवारी पुणे येथे मोठा जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चातही मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.
साहजिकच यामुळे बीड प्रकरणावरून सरकारवर मोठा दबाव निर्माण झाला आहे. सरकार आणि पोलिसांच्या प्रत्येक बाबीवर शंका उपस्थित केली जात आहे. पोलीस तपास, एसआयटी मधील अधिकारी, संशयित आरोपींचे पोलिसांशी असलेले सबंध यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या सर्वांच्या केंद्रबिंदू म्हणून केवळ मंत्री धनंजय मुंडे यांचेच नाव समोर येत असल्याने त्यांचा राजीनामा होणार का? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार याबाबत काय निर्णय घेतात याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान लवकरच मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत निर्णय होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांकडून समजते.