![]() |
सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाची कारवाई; तिघांचा समावेश ; ५.६६ लाखांचा मुद्देमाल जप्त
सांगली / प्रतिनिधी
कर्नाटकातील सराईत चोरट्यांची टोळी सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद केली आहे. या टोळीत तिघांचा समवेश असून त्यांच्याकडून रोख रक्कम, दुचाकी असा ५ लाख ६६ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. शहरातील गणपती पेठ येथील एक दुकान फोडून चोरी केल्याचे त्यांनी कबूल केले आहे, अशी माहिती एलसीबीचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक सतिश शिंदे यांनी दिली.
सुहेल ए. जे. लियाकत अली (वय २५), एस. डी. इरफान अली एस.दस्तगीर (वय २१), बी. के. मोहमद तय्यब रेहमानवली (वय २१,सर्व रा. होस्पेट, जि. बेल्लारी) अशी अटक केलल्यांची नावे आहेत.
शहरातील गणपती पेठ येथील एक दुकान फोडून रोकड तसेच अन्य साहित्य लंपास करण्यात आले होते. यातील संशयितांना पकडण्यासाठी निरीक्षक शिंदे यांनी सहायक निरीक्षक पंकज पवार यांचे एक विशेष पथक तयार केले होते. पथकातील विक्रम खोत यांना तानंग फाटा येथे तिघेजण एका दुचाकीवरून संशयास्पदरित्या फिरत असल्याची माहिती खबऱ्याद्वारे मिळाली. पथकाने त्या परिसरात सापळा रचला होता. तानंग फाटा परिसरात संशयास्पदरित्या फिरत असताना पथकाने त्यांना ताब्यात घेतले.
त्यांच्याकडील सॅकची तपासणी केल्यानंतर त्यामध्ये पाच लाखांची रोकड सापडली. त्याबाबत चौकशी केल्यानंतर त्यांनी ती रोकड गणपती पेठ येथील एक दुकान फोडून तेथून चोरल्याची कबुली दिली. तसेच त्यांच्याकडील दुचाकीबाबत चौकशी केल्यानंतर ती विजयनगर चौक येथून चोरल्याची कबुली दिली. तिघेही कर्नाटकमधील सराईत गुन्हेगार आहेत. त्यांना सांगली शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. एलसीबीचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक सतिश शिंदे यांच्या मार्गदर्शनाने सहायक निरीक्षक पंकज पवार, महादेव नागणे, सागर लवटे, संदीप गुरव, विक्रम खोत, मच्छिंद्र बर्डे, संदीप नलवडे, कॅप्टन गुंडवाडे, उदय माळी आटींच्या पथकाने ही कारवाई केली.
